कपाशीवर बोंडअळीचा 'अटॅक'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:25 AM2017-08-27T00:25:46+5:302017-08-27T00:26:03+5:30
उपविभागीय कार्यालयामार्फत अमरावती व भातकुली तालुक्याचा क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत कीड सर्वेक्षक व कीड नियंत्रक यांनी दौरा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उपविभागीय कार्यालयामार्फत अमरावती व भातकुली तालुक्याचा क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत कीड सर्वेक्षक व कीड नियंत्रक यांनी दौरा केला. यावेळी पहिल्या टप्प्यातील पेरणी झालेल्या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे. यासाठी वेळीव व्यवस्थापन करण्याचा सल्ला शेतकºयांना देण्यात आला.
या गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी शेतकºयांनी शेताचे प्रथम निरीक्षण करावे. गुलाबी बोंडअळी ही पीक पात्या-फुले व बोंडावर असताना पिकावर येऊन कपाशीच्या बोंडात शिरते. एकदा की अळी बोंडात शिरली की छिद्र बंद होते. बोंडाचे वरून निरीक्षण केले तरी प्रथमदर्शी ती दिसून येत नाही. परंतु या अळीमुळे प्रादुर्भावग्रस्त बोंड ही अपरिपक्व अवस्थेतच फुटतात. त्यामुळे कापसाची प्रतवारी खराब होते. बोंडांतील अळळ्या रूईमध्ये छिद्र करून सरकी खातात. त्यामुळे रूईची प्रतवारी खराब होते व सरकीमधील तेलाचे प्रमाण खालावते व बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते. या अळीच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सी. २० मिली, प्रोफेनोफॉस ५० इ.सी., फ्लुबेंडामाईड ३९.३५ टक्के प्रवाही २.५ प्रती १० लिटर पाण्यात मिसळून यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी, असा सल्ला दुर्गापूर येथील कृषी संशोधन केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ के.पी.सिंग तसेच कीड नियंत्रक वैशाली वानखडे, राहुल देशमुख यांनी दिला आहे.
पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पावसाच्या खंडामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.शेतकºयांनी पिकाचे निरीक्षण करून वेळीच उपाययोजना केल्यास नुकसान टाळता येते. यासाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
- प्रीती रोडगे,
उपविभागीय कृषी अधिकारी, अमरावती