कॅल्शियम कार्बाईडने पिकविला जातोय फळांचा राजा
By admin | Published: May 29, 2014 11:31 PM2014-05-29T23:31:05+5:302014-05-29T23:31:05+5:30
उन्हाळामध्ये आंब्याचा रस घराघरांत मोठय़ा आवडीने करण्यात येत असला तरी फळांचा राजा (आंबा) सद्यस्थितीत आरोग्यासाठी मोठा घातक ठरत आहे. जिल्ह्यात आंबे पिकविण्यासाठी सर्रास कॅल्शियम कार्बाईडचा
अमरावती : उन्हाळामध्ये आंब्याचा रस घराघरांत मोठय़ा आवडीने करण्यात येत असला तरी फळांचा राजा (आंबा) सद्यस्थितीत आरोग्यासाठी मोठा घातक ठरत आहे. जिल्ह्यात आंबे पिकविण्यासाठी सर्रास कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यात येत असून, त्याला पिवळा रंग येण्यासाठी रासायनिक घटकांचा वापर होत असल्याने मानवाच्या किडनी आणि यकृतावर त्याचे वाईट परिणाम होत आहे.
जिल्ह्यात आंब्याची मोठय़ा प्रमाणात विक्री सुरू असून, सद्यस्थितीत हा आंबा आंध्र प्रदेश व कर्नाटकातून आयात केला जात आहे. जिल्ह्यातील आंब्याची वाढती मागणी लक्षात घेता दर तिसर्या दिवशी तब्बल ८ ते १0 ट्रक आंबा आयात करण्यात येतो. आयात केलेले हे आंबे पिकविण्यासाठी सर्रास कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत आहे. कॅल्शियम कार्बाइडमध्ये फॉस्फरस आणि अर्सेनिक हे रासायनिक घटक असून, ही दोन्ही घटक किडनी आणि यकृतावर गंभीर परिणाम करतात. यासोबतच आंब्यातील रसाला पिवळा रंग आणण्यासाठी गॅसचा वापर करण्यात येत असून, त्यामुळे आंबा सडण्याची प्रक्रिया काही काळ लांबते. आंब्यावर करण्यात येत असलेली ही रासायनिक प्रक्रिया मोठी जीवघेणी असून आपण मोठय़ा चवीने खाण्यासाठी वापरत असलेला आंबा सध्यातरी आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.
उन्हाळ्यामधील तीन ते चार महिनेच उपलब्ध होणारा आंबा मागील काही वर्षांपासून तब्बल सहा ते आठ महिने मिळत आहे. या आंब्यांवर विविध प्रक्रिया तसेच निर्जंतूक करून तो बराच काळ खाण्यायोग्य ठेवून वापरण्यात येत आहे. मात्र रासायनिक घटकांचा वापर करून पिकविणे आणि ते सडू नये, यासाठी करण्यात येत असलेली प्रक्रिया मानवाच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे.