धनगर समाजाची राजकीय, शैक्षणिक, आर्थिक सक्षमीकरणाची साद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 05:00 AM2022-06-04T05:00:00+5:302022-06-04T05:01:02+5:30
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शुक्रवारी आयोजित विभागीय धनगर कार्यकर्ता परिषदेत हाच धागा पकडून पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, रेटून खोटे बोलणाऱ्यांनी आश्वासनधर्म पाळला नाही. त्यामुळे आता अशा प्रवृत्तींना थांबविले पाहिजे. खरे तर धनगर समाज हा प्रेमाची भावना जोपासणारा समाज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी निवडणुकीत मतांसाठी भाजपने केवळ आश्वासन दिले. प्रत्यक्ष काहीही केले नाही. त्यामुळे धनगर समाजाला राजकीय, शैक्षणिक, आर्थिक सक्षमीकरणाची अपेक्षा आहे, हा सूर अमरावती येथे आयोजित विभागीय धनगर कार्यकर्ता परिषदेत उमटला.
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शुक्रवारी आयोजित विभागीय धनगर कार्यकर्ता परिषदेत हाच धागा पकडून पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, रेटून खोटे बोलणाऱ्यांनी आश्वासनधर्म पाळला नाही. त्यामुळे आता अशा प्रवृत्तींना थांबविले पाहिजे. खरे तर धनगर समाज हा प्रेमाची भावना जोपासणारा समाज आहे. त्यामुळे समाजाला राजकीय, शैक्षणिक, आर्थिक सक्षमीकरणासाठी न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व जण तुमच्यासोबत असल्याचे सांगत या समाजाला सामाजिक, शैक्षणिक, राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहोत.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले होते. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, आ. बळवंत वानखडे, दिव्यांग विभागाचे प्रदेशाध्यक्ष किशोर बोरकर, प्रवक्ते तथा आयोजक दिलीप एडतकर, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार उपस्थित होते.
धनगर समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी, समाजाचे सर्वसमावेशक सक्षमीकरण करण्यासाठी काँग्रेस पक्ष व आम्ही सर्व मंडळी सोबत असल्याची ग्वाही मान्यवरांनी यावेळी दिली. कार्यकर्ता परिषदेला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनगर समाजाच्या आरक्षणाची सबुरी संपत आहे
परिषदेला संबोधित करताना माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख म्हणाले, शिर्डी येथे काँग्रेसचे नवसंकल्प शिबिर पार पडले. यावेळी या ठिकाणी श्रद्धा, सबुरी असे शब्द सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी २०१४ मध्ये भाजपने आश्वासन दिले होते. परंतु, पाच वर्षात काहीच मिळाले नाही. त्यामुळे आता धनगर समाजाची सबुरी संपत आली आहे. गत निवडणुकीत भाजपने दिलेला ‘सबका साथ सबका विकास’चा नारा मतदारांच्या पचनी पडला. मात्र, देशात आता लोकांचे महत्त्वाचे प्रश्न सोडून काय चालले आहे, हे पाहतच आहात. त्यामुळे आता धनगर समाजाने जागरूक राहावे, असे आवाहन सुनील देशमुख यांनी यावेळी केले.
चुकीच्या व्यवस्थेमुळे न्याय मागण्याची वेळ : पटाेले
धनगर समाज हा मागणारा नाही, देणारा समाज होता. मात्र, सध्या देशात चुकीच्या व्यवस्थेमुळे या समाजाला आरक्षणाची मागणी करावी लागत आहे. भाजपने आश्वासन न पाळता केवळ मते घेतली. आम्ही लोकशाही मार्गाने व संविधानावर विश्वास ठेवणारे आहोत. याच मार्गाने धनगर समाजाला न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
राजस्थानमध्ये सबसिडी, मग येथेही द्यावी : देसाई
धनगर समाजाचा मुख्य व्यवसाय मेंढ्या, गाई, म्हशी पाळणे हा आहे. शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या या समाजाला आरक्षण तर मिळायला हवेच, याशिवाय राजस्थान सरकारकडून दुग्धजन्य पदार्थ निर्मितीवर पाच टक्के सबसिडी दिली जाते. ती महाराष्ट्र सरकारनेही देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई यांनी केली.