वाहतूक कोंडीबाबत संयुक्त बैठक बोलवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:09 PM2018-12-27T22:09:18+5:302018-12-27T22:09:50+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारा काँक्रिटीकरणासाठी शहरातील रस्ते खोदून ठेवले व कामे संथगतीने होत आहेत. संबंधित सर्व यंत्रणांमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रत्येक रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारा काँक्रिटीकरणासाठी शहरातील रस्ते खोदून ठेवले व कामे संथगतीने होत आहेत. संबंधित सर्व यंत्रणांमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रत्येक रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, यासाठी या कामांशी संबंधित सर्व यंत्रणांची संयुक्त बैठक बोलावून नियोजन करावे, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांसह नगरसेवकांनी गुरूवारी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे केली.
शहरात बांधकाम विभागाद्वारा काँक्रिटीकरणासाठी सगळीकडे रस्ते खोदून ठेवले आहेत. रस्ते, नाल्यांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. शहरात चार ते पाच वर्षांपासून हीच स्थिती कायम आहे. कामाचे नियोजन नसल्याने कामे केव्हाही बंद अन् सुरू करण्यात येतात. महावितरण व मजीप्राच्या कामांचीही हीच स्थिती आहे. यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने नागरिकांचे मात्र, हाल होत आहेत. वाहतूक पोलीसही या ठिकाणी राहत नाही. केबल टाकण्यासाठी केव्हाही चांगले रस्ते फोडण्यात येत आहेत. कोणत्याही यंत्रणेचा कोनाशी ताळमेळ नाही. एका विभागास विचारणा केली तर दुसºया विभागाकडे अंगुलीनिर्देश करण्यात येतो. यासाठी जिल्हाधिकारी या नात्याने यासर्व विभागाची संयुक्त बैठक बोलावून कामांचे नियोजन करावे, जेणेकरून सर्वसामान्यांना वाहतुकीचा त्रास होणार नाही, अन्यथा काँग्रेस पक्षाद्वारा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला. यावेळी विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, विलास इंगोले, मनोज भेले, प्रशांत डवरे, शोभा शिंद, योगेश गावंडे, सुनील इंगोले, शरद ठोसरे, अनिल वनवे, आकाश सोनटक्के, अनिल काळे, उमेश ठाकरे, देवचंद शेंडे, आकाश मानकर, रवींद्र धानोरकर, निलेश शर्मा, बबलू दुबे आदी उपस्थित होते.
पोलिसांचे वाहतुकीकडे कमी, वसुलीकडे अधिक लक्ष
शहरातील वाहतूक शिपायांचे वाहतुकीच्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष असून, केवळ वसुलीकडेच अधिक लक्ष असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यामुळे जीवघेणी वाहतूक बोकाळली व लहान-मोठे अपघात होत आहेत. कामावर कंत्राटदारांची मनमानी आहे. मोठे कंत्राटदार ऐकत नसल्याचे अधिकारी, कर्मचारी सांगतात. नियोजनाअभावी कंत्राटदारांनी शहरात धिंगाणा घातला आहे. एक विभाग केवळ दुसºया विभागाकडे बोट दाखविण्यात धन्यता मानत आहे. यासाठी या सर्व विभागांची संयुक्त बैठक बोलावून नियोजन ठरविणे महत्त्वाचे असल्याचे पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांना सांगितले.