मागितली भाकरी, मिळाली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 01:36 AM2019-01-25T01:36:08+5:302019-01-25T01:36:32+5:30

पुनर्वसनाने आम्हाला दिले काय? दोन टाइमच्या जेवणाची सोय नाही, शेतीची मागणी केली, मुंबईला बैठका झाल्यात, त्या वांझोटा ठरल्या. देतो म्हणतात, पण प्रत्यक्ष काही देत नाही, अशी व्यथा आदिवासी महिलांनी बुधवारी मांडली.

Called bread, got shot | मागितली भाकरी, मिळाली गोळी

मागितली भाकरी, मिळाली गोळी

Next

नरेंद्र जावरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : पुनर्वसनाने आम्हाला दिले काय? दोन टाइमच्या जेवणाची सोय नाही, शेतीची मागणी केली, मुंबईला बैठका झाल्यात, त्या वांझोटा ठरल्या. देतो म्हणतात, पण प्रत्यक्ष काही देत नाही, अशी व्यथा आदिवासी महिलांनी बुधवारी मांडली.
'जंगलात गेलो तर गोड बोलून परत आणतात. पुन्हा विसरून जातात. आता तिसऱ्यांदा गेलो आश्वासने सोडून. प्रत्यक्षात शेतजमीन व दीड लक्ष रुपये मिळाल्याशिवाय उठायचे नाही, असा ठाम निर्धार केला ते तर मिळालेच नाही. मात्र, वनाधिकाऱ्यांनी आम्हाला बळजबरीने काढण्यासाठी लाठीचार्ज केला. अश्रूधुरांच्या नळकांड्या आमच्यावर फोडल्या. आमच्या दुचाकी जाळल्या. सामानाची तोडफोड केली. अन्नधान्यांची नासधूस केली. महिला पुरुषांना झोडपून काढले आणि यातूनच संघर्ष उडाला. यात आमचा दोष काय, हे आम्हाला सांगा आम्ही जगायचे कसे? गावातील दहा एकर जमीन असताना इथे इंचभर जमिनीचा तुकडा नाही, खायचे काय, जगायचे कसे, या विवंचनेत आम्ही आठ गावांतील पुनर्वसित आदिवासी कसेबसे दिवस काढत आहोत. त्यात तीनशेवर आदिवासी युवक, वृद्धांचा मृत्यू या सहा वर्षांत झाला. संपूर्ण पिढीच आमची नष्ट करण्याचा हा डाव शासनाने रचला आहे. किती सहायचे आम्ही? आता आमचा हक्क घेऊनच राहू, यासाठीच आम्ही उर्वरित जीवन कंठत असल्याचे चंपालाल लाभू बेठेकरसह गंगा कासदेकर फुलकली आदी महिलांनी बुधवारी अमोना कासोद या गावी आपल्या व्यथा 'लोकमत'जवळ मांडल्या. पुनर्वसन दरम्यान आमच्या बँकेतील खात्यात टाकलेल्या दहा लक्ष रुपयातून हातपंप नाल्या रस्ते आदी मूलभूत सुविधा करून देण्यात येणार असा कुठल्याच प्रकारचा निर्णय आम्हाला सांगण्यात आला नव्हता त्या पैशातूनच सर्व पुनर्वसनाच्या सोयीसुविधा देण्यात आल्या त्यामुळे आमच्या पोटाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला त्या दहा लक्ष रुपयातून शेती किंवा इतर काही घेण्याची आमची उमेद होती मात्र शासनाच्या निर्णयाचे बसत नसल्याने आम्ही मूलभूत सुविधा व शेतीचा प्रस्ताव शासनाकडे ठेवला मागील तीन वर्षांपासून आम्हाला केवळ भूलथापाच दिल्याचे त्या म्हणाल्या.

हल्ल्याचा आयएफएस असोसिएशनकडून निषेध
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात कर्तव्यावर असलेल्या वनाधिकारी-कर्मचारी, पोलीस अधिकाºयांवर केलेल्या हल्ल्याचा आयएफएस असोसिएशनकडून निषेध करण्यात आला. असामाजिक घटकांकडून झालेल्या या हल्ल्यात कर्तव्यावरील वनाधिकारी, वनकर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झालेत. या खुनी हल्ल्यात काही गंभीर झालेत. यावर त्यांनी खेद, दु:ख व्यक्त केले. हल्लेखोरांवर, असामाजिक घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आयएफएस असोसिएशनकडून करण्यात आली आहे.
लाठीमार केला अन् संघर्षाला सुरुवात झाली
जंगलात मंगळवारी आदिवासींचा वनविभाग व पोलीस कर्मचाºयांशी संघर्ष झाल्यानंतर मिळेल त्या जंगलातील रस्त्याने महिला-पुरुष पळत सुटले. पुढे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी होते. त्यांच्या मागे संरक्षणासाठी पोलीस, सीआरपीएफचे जवान होते. वनविभागाने आदिवासींची वाहने पेटविली. लाठीहल्ला केला. धान्याची नासधूस करून जंगलाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जंगलात आदिवासी सैरावैरा पळत होते. रात्री २ वाजता अमोना कासोद गावी आले. २० पेक्षा अधिक महिला, पुरुष जखमी झालेत. चंपालाल बेठेकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने जंगलात तो पडून होता. त्याने जीव मुठीत घेऊन कसाबसा पळ काढला. सहकाऱ्यांनी अंगावर गवत टाकून त्याला लपविले. सर्व शांत झाल्यावर एक किमीपर्यंत त्याला फरफटत नेले. काही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याची मागणी आदिवासींनी केली आहे.
आदिवासींनीच केला हल्ला
जंगलातून बाहेर पुनर्वसित गावी चला, अशा विनवण्या आदिवासींना वारंवार करण्यात आल्या. मंगळवारीसुद्धा तेच सुरू असताना अचानक वनकर्मचारी पोलिसांच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकून धारदार कुºहाड व शस्त्रांनी हल्ला चढविला. गोफणीने दगड भिरकावले. त्यात सीआरपीएफच्या जवानांकडे असलेल्या सुरक्षा जाळी तुटल्या. अधिकारी-कर्मचारी जीव मुठीत घेऊन जंगलातून पळत सुटले. समजावण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने हा संपूर्ण ताफा परत जात असताना हा हल्ला झाल्याचे चिखलदरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक आकाश शिंदे व तहसीलदार प्रदीप पवार यांनी सांगितले.

Web Title: Called bread, got shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.