अकोल्याहून आला, अमरावतीत चोऱ्या केल्या, १७ दुचाकी जप्त
By प्रदीप भाकरे | Published: January 22, 2024 06:30 PM2024-01-22T18:30:50+5:302024-01-22T18:32:53+5:30
सराईत चोरट्यावर सिटी कोतवाली ठाण्याची कारवाई
अमरावती: अकोला जिल्ह्यातून अमरावतीत येत येथून दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरास सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली. २१ जानेवारी रोजी त्याच्याकडून ७.७० लाख रुपये किमतीच्या चोरीच्या १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या. ठाणेदार विजयकुमार वाकसे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
कॉटन मार्केट येथे भाजीपाला घेत असताना आपली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार संजय तरेकर (५५,उत्कर्ष, नगर) यांनी १३ सप्टेंबर २०२३ रोजी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्या गुन्ह्याचा तपास करित असताना ती चोरी संतोष देवराव बोबडे (३८, रा. कुरुम, जि. अकोला) याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे त्याला अटक करून आधी तरेकर यांची दुचाकी ताब्यात घेण्यात आली. चौकशीदरम्यान त्याच्याकडून अन्य ठिकाणांहून चोरलेल्या १६ दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले.
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील, एसीपी शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजयकुमार वाकसे यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षक ज्योती विल्हेकर, उपनिरिक्षक एस. एस. चिपडे, एएसआय रंगराव जाधव, अंमलदार मलिक अहेमद, आशिष इंगळेकर, प्रमोद हरणे, पंकज अंभोरे, आनंद जाधव, पुरु फकिरावाले, नरेंद्र उगले यांनी ही कारवाई केली.