सीमेवर वाहनांची ‘इन कॅमेरा’ तपासणी
By admin | Published: October 11, 2014 10:56 PM2014-10-11T22:56:13+5:302014-10-11T22:56:13+5:30
विधानसभा निवडणुकीला उणेपुरे तीन दिवस शिल्लक असताना उमेदवारांनी कोणत्याही गैरप्रकाराचा वापर करु नये, यासाठी सीमेवर वाहनांची २४ तास ‘इन कॅमेरा’ तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात राजकीय पक्षांच्या
नाकाबंदी : गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस दक्ष
गणेश वासनिक - अमरावती
विधानसभा निवडणुकीला उणेपुरे तीन दिवस शिल्लक असताना उमेदवारांनी कोणत्याही गैरप्रकाराचा वापर करु नये, यासाठी सीमेवर वाहनांची २४ तास ‘इन कॅमेरा’ तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात राजकीय पक्षांच्या उमेदवारांची मोठी रक्कम येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक दक्ष झाले आहेत.
शहराच्या सीमेवरील सर्व प्रमुख मार्गांवर पोलिसांनी राहुट्या टाकल्या असून कटाक्षाने प्रत्येक वाहन तपासले जात आहे. सर्व प्रमुख आणि अंतर्गत मार्गावरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. दुचाकी वगळता सर्व वाहनांची ‘इन कॅमेरा’ तपासणी होत आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान गाडगेनगर व फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत आतापर्यंत ३४ लाख रुपये पोलिसांनी पकडले. मात्र,चौकशीअंती ही रक्कम परत करण्यात आली. आचारसंहिता सुरू होताच ही प्रक्रिया सुरू झाली आहे. वाहनांची तपासणी करताना त्या वाहनाचा प्रत्येक भाग ‘इन कॅमेरा’ टिपला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या नकळत कोणती चूक होऊ नये, यासाठी हा प्रयत्न आहे.