ग्रा.पं.च्या प्रचारतोफा थंडावल्या; आता बंदद्वार बैठकी, तडजोडींवर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 02:47 PM2022-12-17T14:47:52+5:302022-12-17T14:48:27+5:30

रविवारी मतदान, २५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी; उमेदवार, नेत्यांची होणार परीक्षा

campaign ends for Gram Panchayat election, voting on 18 december | ग्रा.पं.च्या प्रचारतोफा थंडावल्या; आता बंदद्वार बैठकी, तडजोडींवर भर

ग्रा.पं.च्या प्रचारतोफा थंडावल्या; आता बंदद्वार बैठकी, तडजोडींवर भर

googlenewsNext

अमरावती : गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात २५७ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत थेट राजकीय पक्षांची ‘एन्ट्री’ नसली तरी गावा-गावातील पॅनल हे कोणत्या तरी राजकीय पक्षाशी निगडित आहे. त्यामुळे शुक्रवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता प्रचार तोफा थंडावल्या आहेत. आता उमेदवारांच्या विजयासाठी नेत्यांची परीक्षा ठरणार आहे. परिणामी नेत्यांनी आता बंदद्वार बैठकी आणि तडजोडींवर भर देण्याची रणनीती आखली आहे. यात कोण यशस्वी होते, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यात २५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आहे. १४ तालुक्यांत ही निवडणूक होत असून, ८३५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे १८ डिसेंबर राेजी २५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात येणार आहे. ही निवडणूक ग्रामीण भागाशी निगडित असल्याने त्या-त्या विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी आपले वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायतीवर विजय मिळविण्यासाठी शनिवारचा दिवस बंदद्वार बैठकी, तडजोडींवर भर देण्यासाठी नियोजन केले आहे. प्रचार तोफा थंडावल्यामुळे आता गुप्त बैठकी आणि मतदारांच्या भेटीगाठींवर लक्ष केंद्रित केले आहे.

ग्रामपंचायत निकालावर आमदारांची परीक्षा

जिल्ह्यात १४ तालुक्यात २५२ ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्यांसाठी रविवारी मतदान होणार आहे. विशेषत: आमदार यशोमती ठाकूर, बच्चू कडू, राजकुमार पटेल, बळवंत वानखडे, रवी राणा, देवेंद्र भुयार यांच्या विधानसभा क्षेत्रात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्याने जणू त्यांची परीक्षा ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांनीही या निवडणुकीत उडी घेतल्याने १४ तालुक्यांत चुरस वाढल्याचे चित्र आहे.

थेट सरपंचपदाच्या निवडणुकीने आली रंगत

यंदा पहिल्यांदाच थेट सरपंचपदाची निवडणूक होत आहे. २५२ ग्रामपंचायतींमधून मतदारांना थेट सरपंच निवडून द्यायचे आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी घरोघरी प्रचार करून मतदारांशी भेटीगाठींचा सिलसिला गत १५ दिवसांपासून सुरू आहे. तथापि, शुक्रवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावताच उमेदवारांसह नेत्यांच्या पायाला भिंगरी लागल्याचे दिसून आले. काही ग्रामपंचायत निवडणुकीत विजयासाठी काही उणिवा आहेत, हे लक्षात येताच त्या दूर करण्यासाठी नेत्यांनी प्लॅनिंग चालविले आहे.

Web Title: campaign ends for Gram Panchayat election, voting on 18 december

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.