अंभोरी तलावाचा कालवा फुटला, पिके वाहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:16 AM2021-09-15T04:16:45+5:302021-09-15T04:16:45+5:30
मोर्शी : नजीकच्या अंभोरी तलावाचा कालवा फुटून उभ्या पिकात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची ...
मोर्शी : नजीकच्या अंभोरी तलावाचा कालवा फुटून उभ्या पिकात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मोर्शी तालुक्यातील आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या धानोरा लगत अंबोरी तलाव असून या तलावातून कालव्याद्वारे नाल्यात पाणी सोडल्या जाते. मुसळधार पावसाने मोर्शी तालुक्यातील अंभोरी तलाव लबालब भरला. परंतु, त्यावरील कालवा फुटल्याने १० शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून कपाशी, तूर, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी पिके सडू लागली. अंभोरी तलावाचा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा नसताना हा तलाव डोकेदुखी ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आला आहे. आता अंभोरी तलावाचा कालवा फुटल्याने शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसून पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांची पूर्णत: जमीन खरडून निघाली व उभ्या पिकाचे नुकसान झाले. याची तक्रार राजस्व कार्यालयापर्यंत करण्यात आली होती. मात्र, अद्यापही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. शासन व प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी जयकिशन धुर्वे, मारोती धुर्वे, शालिक धुर्वे, प्रवीण आहाके, रमेश काळे, उमराव झोड, महादेव कुंबरे, भारत रंगारी आदींनी केली आहे.