गांधींना ‘पाकिस्तानचे पिता’ संबोधणारे सौमित्र यांची नियुक्ती रद्द करा; जनआंदोलन छेडण्याची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 01:25 AM2021-01-02T01:25:32+5:302021-01-02T07:03:14+5:30
अमरावतीत पत्रपरिषद, जनआंदोलन छेडण्याची भूमिका
अमरावती : महात्मा गांधींना ‘फादर ऑफ पाकिस्तान’ संबोधणारे अनिल कुमार सौमित्र यांची अमरावतीच्या आयआयएमसी (भारतीय जनसंचार संस्था) येथे करण्यात आलेली नियुक्ती रद्द करावी. त्यांच्या रूपातील अविचारीपणा आम्हाला येथे नको, अशी भूमिका गांधीवादी विचारवंत व शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत मांडली. मध्य प्रदेश भाजपच्या मीडिया सेलचे निलंबित प्रमुख अनिल कुमार सौमित्र यांची आयआयएमसीतील प्राध्यापकपदी नियुक्ती झाल्याचा मुद्दा ‘लोकमत’ने ३१ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध केला.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला ज्यांचे नाव आहे, त्या गाडगेबाबांनी विचारांची घाण साफ करण्यासाठी आयुष्य वाहिले. त्याच विद्यापीठाच्या आवारातील संस्थेत महात्मा गांधींना ‘फादर ऑफ पाकिस्तान’ म्हणणारी व्यक्ती नियुक्त होते. अशाप्रकारे विद्यापीठाला डम्पिंग यार्ड बनवू नका. पंतप्रधान विदेशात महात्मा गांधींचे गोडवे गातात. गांधी नाहीत, तर ‘फादर ऑफ इंडिया’ जिना आहेत काय? त्यांना नथुराम गोडसेला ‘फादर ऑफ नेशन’ करायचे असेल, तर त्यांनी उघडपणे करावे. या प्रवृत्तीविरुद्ध आमचा लढा आहे.
लोकही त्यात सहभागी होतील. पालकमंत्री, कुलगुरूंनी लक्ष घालून सौमित्र यांना दिल्लीला परत पाठवावे, अशी मागणी वानखडे यांनी केली.अनिल कुमार सौमित्र ही एक प्रवृत्ती आहे. ती आयआयएमसी, अमरावतीत प्रवेश घेतलेल्या भावी पत्रकारांचे ब्रेन वॉश करून जाईल. त्यामुळे सौमित्र यांना विद्यापीठात पाय ठेवू देऊ नका, या मागणीचे पत्र संत कुलगुरूंना देणार असल्याचे माध्यम संवाद तज्ज्ञ आनंद मांजरखेडे यांनी स्पष्ट केले