बाळासाहेब वानखडेंवरील गुन्हे रद्द करा
By admin | Published: November 15, 2016 12:17 AM2016-11-15T00:17:20+5:302016-11-15T00:17:20+5:30
दर्यापूर तालुक्यातील राजकीय तथा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वानखडे यांच्याविरुध्द अॅट्रॉसिटी कलमान्वये लावलेले गुन्हे रद्द करावेत, ..
सकल मराठा समाजाची मागणी : प्रभारी पोलीस आयुक्तांना निवेदन
अमरावती : दर्यापूर तालुक्यातील राजकीय तथा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वानखडे यांच्याविरुध्द अॅट्रॉसिटी कलमान्वये लावलेले गुन्हे रद्द करावेत, अशी मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने सोमवारी करण्यात आली. याबाबत प्रभारी पोलीस आयुक्त विवेक पानसरे यांना समाजाच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले.
वानखडे हे समाजातील गणमान्य व्यक्ती असून ते लोकहितार्थ शिक्षण संस्था चालवितात. त्यात विविध धर्म आणि जातीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकही आहेत. या संस्थेत आजपर्यंत कुठलीही तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र, सरस्वती विद्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या अशोक उत्तम वानखडे या कला शिक्षकाने बाळासाहेब वानखडे व संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांसह सहायक शिक्षकांविरुध्द अॅट्रॉसिटी आणि खंडणी मागण्याची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल केली. उल्लेखनीय म्हणजे कथित घटनेच्यावेळी बाळासाहेब वानखडे हे सरस्वती विद्यालयात हजरच नव्हते. ते दर्यापूर येथे असताना ते आरोपी कशे, असा सवाल उपस्थित करीत बाळासाहेब वानखडे यांच्यावर लावलेला अॅट्रॉसिटीचा आरोप रद्द करावा, अशी मागणी यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)