रासायनिक खतांची दरवाढ रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:13 AM2021-05-20T04:13:09+5:302021-05-20T04:13:09+5:30
चांदूर रेल्वे : रासायनिक खतांच्या किमतीत केलेली वाढ रद्द करावी, अशी मागणी येथील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे ...
चांदूर रेल्वे : रासायनिक खतांच्या किमतीत केलेली वाढ रद्द करावी, अशी मागणी येथील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे स्थानिक तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून बुधवारी करण्यात आली.
रासायनिक खतांच्या भावात ६०० ते ७०० रुपयांची भरमसाठ वाढ झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या भाववाढीने आणखी एक धस्का दिला आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या किमतीतील दरवाढ रद्द करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाची खरेदी करणारी यंत्रणा निर्माण करावी व त्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवावी, मनरेगाची अंमलबजावणी करावी, शेतकरी-शेतमजूर व ग्रामीण कारागीर यांना १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, शेतीसंबंधी केंद्र सरकारने केलेले तीन काळे कायदे रद्द करावे आदी मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात. यावेळी विजयकुमार रोडगे, देवीदास राऊत, विनोद जोशी, नितीन गवळी, शिवाजीराव देशमुख, चरण जोल्हे, सुभाष चव्हाण, रामदास कारमोरे, कृष्णकुमार पाटील, प्रभाकर कडू आदी उपस्थित होते.