अचलपूर तालुक्यात दोन कृषी केंद्रांचे परवाने रद्द ; पाच ठिकाणी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 08:12 PM2017-10-14T20:12:52+5:302017-10-14T20:12:52+5:30
बंदी घालण्यात आलेल्या खते व कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या अचलपूर तालुक्यातील दोन कृषीसेवा केंद्राचे परवाने तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शनिवारी रद्द केले.
परतवाडा- बंदी घालण्यात आलेल्या खते व कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या अचलपूर तालुक्यातील दोन कृषीसेवा केंद्राचे परवाने तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शनिवारी रद्द केले. कीटकनाशाकामुळे शेतकऱ्यांना बाधा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक कृषी अधिका-यांनी मोहीम राबवून पाच विविध ठिकाणी दीड लाख रुपयांच्या जहाल कीटकनाशकांच्या बंदीचे आदेश दिले.
बंदी घालण्यात आलेल्या कृषीसेवा केंद्रामधील धोतरखेडा येथील वेदांत कृषीसेवा केंद्र व रासेगाव येथील वनवे कृषीसेवा केंद्राचा समावेश आहे. तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्या संयुक्त कारवाईत वेदांत कृषीसेवा केंद्रात अनेक अनियमितता आढळून आल्यात. यावर अमरावती येथील कृषी अधिका-याच्या दालनात सुनावणी झाली. यानंतर या प्रतिष्ठानाचा कीटकनाशक विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला. याशिवाय वनवे कृषी सेवा केंद्राचा खते विक्रीचा परवाना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आला आहे. तालुक्यात फवारणीसंदर्भात मार्गदर्शन करण्याकरिता ५५ ठिकाणी सभा घेण्यात आल्यात.
शासनेने कृषी केंद्रात बिगर नोंदणीकृत उत्पादने विक्रीस पूर्णत: बंदी घातली आहे. यामुळे अशी उत्पादने आढळल्यास त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील.
- राम देशमुख, कृषी अधिकारी पं.स. अचलपूर