मतदान केंद्रांवर झळकल्या उमेदवारांच्या ‘कुंडल्या’
By admin | Published: February 22, 2017 12:07 AM2017-02-22T00:07:13+5:302017-02-22T00:07:13+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच महापालिका निवडणूक लढविणाऱ्या एकूण १५७८ उमेदवारांचे इत्यंभूत प्रोफाईल सर्वच मतदानकेंद्रांवर झळकले.
अमरावती : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच महापालिका निवडणूक लढविणाऱ्या एकूण १५७८ उमेदवारांचे इत्यंभूत प्रोफाईल सर्वच मतदानकेंद्रांवर झळकले. निवडणूक विभागाकडे उमेदवारांनी शपथपत्रात सादर केलेला गोषवारा फ्लेक्सव्दारे केंद्राच्या दर्शनी भागात लावला होता. यामुळे मतदान करण्यापूर्वीच मतदारांना उमेदवारांची माहिती उपलब्ध झाली होती.
निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच महापालिका आयुक्तांकडे निवडणूक अधिकारीपदाची जबाबदारी दिली आहे. निवडणूक लढणाऱ्या व्यक्ती विविध समाजघटकातील असतात. संबंधित उमेदवारांना शपथपत्राव्दारे त्यांची कौटुंबिक माहिती, शिक्षण, उत्पन्नाचे स्त्रोत, वार्षिक उत्पन्न, गुन्हेगारी पार्श्वभूमी आदी माहिती सादर करणे क्रमप्राप्त आहे. नामनिर्देशन सादर करताना ही माहिती निवडणू निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली जाते. उमेदवारांनी शपथपत्रात दिलेली माहिती यापूर्वी मतदानकेंद्राबाहेर प्रसिद्ध केली जात नव्हती. मात्र, यावेळी पहिल्यांदाच ही माहिती चक्क फ्लेक्सच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय आयोगाने घेतला. मतदानकेंद्रावर मतदानासाठी जाणाऱ्या नागरिकांना ही माहिती केंद्रातील दर्शनी भागातच दिसेल अशा पद्धतीने उपलब्ध करण्याचे आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच महापालिका प्रशासनाने सर्व मतदान केंद्रांबाहेर संबंधित झोनअंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची माहिती प्रसिद्ध केली आहे. यामुळे मतदारांची उमेदवार निवडताना चांगली सोेय झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
उमेदवारांची कोंडी
जि.प. आणि पंचायत समिती तसेच मनपा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांपैकी काहींवर फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. संबंधित उमेदवाराच्या नावासमोर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. भावी लोकप्रतिनिधी शैक्षणिकदृष्टया उच्चशिक्षित असावा त्याला सामाजिकतेचे भान असावे व तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा नसावा, अशी ेअपेक्षा बाळगणाऱ्या मतदारांचा ऐनवेळी भ्रमनिसार होऊ नये, यासाठी ही क्लृप्ती अतिशय समपर्क ठरली. यामुळे अनेक उमेदवारांची कोंडी झाली होती.