चांदूरच्या बाजार समितीत उमेदवारांचे ‘एकला चलो रे’

By admin | Published: September 10, 2015 12:12 AM2015-09-10T00:12:14+5:302015-09-10T00:12:14+5:30

तालुक्याच्या सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या चांदुरबाजार बाजार समितीच्या निवडणुकीत रिंगणात असणारे उमेदवार आपला गट सोडून वैयक्तिक मतांची मागणी करीत असल्याचे चित्र आहे.

Candidates 'Ekla Chalo Ray' in Chandur's Market Committee | चांदूरच्या बाजार समितीत उमेदवारांचे ‘एकला चलो रे’

चांदूरच्या बाजार समितीत उमेदवारांचे ‘एकला चलो रे’

Next

तोडफोडीचे राजकारण : देशमुख-ठाकरे यांच्या खेळीकडे लक्ष
सुमित हरकुट  चांदूरबाजार
तालुक्याच्या सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या चांदुरबाजार बाजार समितीच्या निवडणुकीत रिंगणात असणारे उमेदवार आपला गट सोडून वैयक्तिक मतांची मागणी करीत असल्याचे चित्र आहे.
कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल असणाऱ्या या बाजार समितीवर वर्चस्व स्थापन करण्यासाठी दिग्गजांनी कंबर कसली आहे. निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळावा, यासाठी दोन्ही गटातील उमेदवारांनी मतदारांचे उंबरठे झिजविणे सुरू केले आहे. यासाठी सहकारक्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी सध्दा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सद्यस्थितीत अचलपूर बाजार समितीवर प्रहार समर्थित शेतकरी पॅनलची सत्ता आहे. सध्या शेतकरी पॅनलचे मनोबल वाढले असून तुल्यबळ लढत असूनही सहकार पॅनलला घरचा अहेर मिळाल्याने सत्तेपासून दूर रहावे लागले. बाजार समितीत १८ जागांसाठी ३८ उमेदवार भाग्य आजमावित आहेत. सेवा सहकारी मतदारसंघासाठी ११ जागा आहेत. मात्र, सोसायटी मतदारसंघात सहकार पॅनलचे वर्चस्व आहे. प्रहार समर्थित शेतकरी पॅनल तोडफोडीचे राजकारण करून सहकार पॅनलला छेद देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्रामपंचायत मतदार संघात चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. अडते व व्यापारी मतदारसंघात सहकार पॅनलचे मनोज नांगलिया, अमोल लंगोटे रिंंगणात आहे. काही मतदारांनी व्यापारी मतदारसंघात आपला काटा काढण्यासाठी बच्चू कडुंच्या शेतकरी पॅनलला साथ दिल्याने सहकार क्षेत्रातील या निवडणुकीत कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. मापारी व हमाल मतदारसंघात अ.सत्तार खाँ व गोपाल सोनवणे यांच्यात काट्याची लढत होण्याची चिन्हे आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार पॅनलमध्ये बबलू देशमुख, माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख, सुरेखा ठाकरे, प्रमोद कोरडे यांच्यासारखे मातब्बर नेते एकवटले आहेत. शेतकरी पॅनलमध्ये बहुतांश उमेदवार वसुधा देशमुख यांचे अतिविश्वासू कार्यकर्ते असल्याने वसुधा देशमुख यावेळी नेमकी कोणती खेळी खेळणार, याकडे तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Web Title: Candidates 'Ekla Chalo Ray' in Chandur's Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.