अपक्ष, छोट्या पक्षांच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 01:27 PM2024-06-06T13:27:20+5:302024-06-06T13:28:04+5:30
Amravati : तीन प्रमुख उमेदवार वगळता ३४ उमेदवारांना मिळाली फक्त ४.५ टक्के मते
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: मंगळवारी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अमरावतीमधून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी नवनीत राणा यांचा १९,७३१ मतांनी पराभव केला. अमरावतीमध्ये सर्वाधिक ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यातील प्रमुख तीन उमेदवार वगळता उर्वरित ३४ उमेदवारांना ५२,९२४ मते मिळाली असून, एकूण वैध मतांपैकी केवळ ४.५ टक्केच मते मिळाली आहेत. त्यामुळे अमरावतीकरांनी अपक्षांसह छोट्या घटक पक्षांच्या उमेदवारांना नाकारल्याचे मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे सर्व देशाचे लक्ष लागून होते. येथे तब्बल २८ वर्षांनी बळवंत वानखडे यांच्या रूपाने काँग्रेसचा खासदार निवडून आला. वानखडे हे काँग्रेसचे पहिले एससी खासदार आहेत. अमरावती लोकसभेच्या मैदानामध्ये तब्बल ३७ उमेदवार उतरले होते. यामध्ये तीन राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार ज्यामध्ये भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसकडून बळवंत वानखडे, तर बसपाकडून संजयकुमार गाडगे मैदानात होते, तर १० छोट्या घटक पक्षांच्या उमेदवारांमध्ये प्रहाराचे दिनेश बूब आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे प्रमुख उमेदवार रिंगणात होते. त्याचबरोबर २४ अपक्ष उमेदवारांनीदेखील अमरावतीच्या निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. त्यामुळे हे अपक्ष आणि छोट्या घटक पक्षाचे उमेदवार कोणाचे गणित बिघडवतील, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते; परंतु निकालामध्ये बसपा या राष्ट्रीय पक्षासह इतर सर्वच अपक्ष व छोट्या घटक पक्षांच्या उमेदवारांना अमरावतीच्या मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्य लढत नवनीत राणा व बळवंत वानखडे यांच्यात झाली. यामध्ये बळवंत वानखडे यांना ५,२६,२७१ मते, तर नवनीत राणा यांना ५,०६,५४० मते मिळाली. त्यांच्या खालोखाल प्रहारचे दिनेश बूब यांना सर्वाधिक ८५,३०० मते मिळाली. उर्वरित सर्वच ३४ उमेदवारांना मिळून ५२,९२४ इतकीच मते मिळाली असून, एकूण वैध मतदानापैकी ४.५ टक्के इतकेच ही मते आहेत. या सर्वच उमेदवारांची अमानत रक्कम जप्त झाली आहे. ३० असे उमेदवार आहेत, ज्यांना नोटापेक्षाही कमी मतदान झाले आहे.