राष्ट्रसंतांच्या महोत्सवावर नरभक्षक वाघाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:19 AM2018-10-26T01:19:37+5:302018-10-26T01:20:07+5:30
तिवसा तालुक्यात धुमाकूळ घालत असलेल्या नरभक्षक वाघाची प्रचंड दहशत गुरुवारी पुण्यतिथी पर्वातही जाणवली.
सूरज दहाट/अमित कांडलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा/गुरूकुंज : तिवसा तालुक्यात धुमाकूळ घालत असलेल्या नरभक्षक वाघाची प्रचंड दहशत गुरुवारी पुण्यतिथी पर्वातही जाणवली.
कालपर्यंत २५ ते ३० कि.मी. अंतरावर असलेला हा पट्टेदार वाघ राष्ट्रसंतांची कर्मभूमी व पुण्यतिथी महोत्सवाचे प्रमुख स्थळ असलेल्या गुरुकुंज मोझरीपासून अवघ्या सहा कि.मी. अंतरावरील रघुनाथपूरच्या शिवारात आढळून आला. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळपासून रघुनाथपूर, अनकवाडी, मालधूर, मोझरी, शिरजगाव परिसराला अलर्टवर ठेवले. सोबतच या परिसरातील शेतशिवारात गेलेल्या शेतमजुरांना कामे सोडून घरी परतायला लावले. रात्रीच्या वेळी कुणीही शेतावर जाऊ नये, असे ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून या भागातील गावांमध्ये प्रशासनाने कळविले आहे.
दरम्यान, राष्टÑसंत तुकडोजी महाराजांचा सुवर्ण पुण्यतिथी महोत्सव गुरुकुंज आश्रम येथे सुरू असून, त्या महोत्सवाला उपस्थित राहण्याकरिता राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो पालख्या गुरुमाउलींच्या कर्मभूमीत डेरेदाखल होत असतात. यासाठी बहुतांश पायदळ वारी करण्यावर भर असतो. पण, मागील तीन दिवसांपासून वाघ कुºहा, रघुनाथपूर या भागात आढळून आल्याने पालखी यात्रेकरूंचा प्रवास धोक्यात आला आहे. त्यांनाही सतर्क करणे गरजेचे ठरत आहे.
महोत्सवात पाचशेवर पालख्या
राष्ट्रसंतांच्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवात यंदा किमान साडेपाचशे ते सहाशे पालख्या दाखल होणार आहेत. गुरुकुंजात येणाºया चारही दिशांनी या पालख्यांचे आगमन मौन श्रद्धांजलीच्या पूर्वसंध्येला अर्थात रविवारी सायंकाळी होईल. याशिवाय पंचक्रोशीतील हजारो गुरुदेवभक्त पायीच गुरुकुंज गाठतात.
पुण्यतिथी महोत्सवासाठी शेकडो पालख्या या मार्गाने येतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने उपाययोजना तात्काळ कराव्यात. आम्हीदेखील गुरुदेवभक्तांना याविषयी सूचित केले आहे.
- जनार्दनपंत बोथे सरचिटणीस
अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ