विद्यापीठ परिसरातील ‘तो’ बिबट ट्रॅप कॅमेऱ्यात कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 10:44 PM2018-12-29T22:44:58+5:302018-12-29T22:45:13+5:30
येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पहाटे भ्रमंती आणि निसर्गाच्या सान्निध्यात शुद्ध वातावरणाचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्यांना प्रवेशास मनाई केली आहे.. कारण तलाव परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे ट्रॅप कॅमेºयात कैद झाले आहे. शुक्रवारी वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट कैद झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पहाटे भ्रमंती आणि निसर्गाच्या सान्निध्यात शुद्ध वातावरणाचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्यांना प्रवेशास मनाई केली आहे.. कारण तलाव परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे ट्रॅप कॅमेºयात कैद झाले आहे. शुक्रवारी वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट कैद झाला.
विद्यापीठाच्या तलाव परिसरात गाय फस्त केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. त्यानंतर विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने वनविभागाला पाचारण केले. घटनास्थळी गाय अर्ध्यापेक्षा जास्त फस्त झालेली असल्याचे वनकर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. पशुवैद्यकीय अधिकारी कुलकर्णी यांनी मृत गाईचा पंचनामा केला. काही अवयव ताब्यात घेतले. ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, गाईची खरेच बिबट्याने शिकार केली काय, याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे लावले होते. या ट्रॅप कॅमेऱ्यात मृत अधर्वट गाय पुन्हा खाण्यासाठी तोच बिबट्या आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बिबट्याचा विद्यापीठ परिसरात संचार असण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. विद्यापीठ प्रशासनाने पहाटे वा सायंकाळी फिरण्यास मनाई केली आहे. तलावाच्या परिसरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तलाव परिसरात प्रवेश न करण्याच्या सूचना लागल्या आहेत. ट्रॅप कॅमेºयात कैद बिबट्या शिकार करण्यासाठी विद्यापीठ परिसरात पुन्हा येईल, अशी शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे.
बिबटे पोहरा-वडाळी जंगलातील!
वनविभागाने विद्यापीठ परिसरात लावलेल्या ट्रॅप कॅमेºयात दोन बिबटे कैद झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठ परिसरात बिबट्यांची संख्या अधिक असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पोहरा, वडाळी जंगलातून बिबट येत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट कैद झाला आहे. त्यामुळे गाईची शिकार बिबट्यानेच केली,हे सिद्ध झाले आहे.. तो पुन्हा शिकारीसाठी त्याच परिसरात येण्याची दाट शक्यता आहे.
- अशोक कविटकर
सहायक वनसंरक्षक
अमरावती.
विद्यापीठ परिसरात फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. बिबट याच भागात असल्यामुळे दक्षतेसाठी हा निर्णय घेण्यात आला. काही अनुचित प्रकार झाल्यास नागरिक जबाबदार राहतील.
- रवींद्र सयाम
उपकुलसचिव, सुरक्षा विभाग विद्यापीठ.