कार आलीच नाही; ९० हजार रुपये बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 12:26 PM2021-08-10T12:26:28+5:302021-08-10T12:27:04+5:30
लकी ड्रॉमध्ये कार लागल्याची बतावणी करून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार अलिकडे अधिक वाढले आहे. सायबर गुन्हेगार विविध प्रलोभन देऊन नागरिकांना फसवत सुटले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: लकी ड्रॉमध्ये कार लागल्याची बतावणी करून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार अलिकडे अधिक वाढले आहे. सायबर गुन्हेगार विविध प्रलोभन देऊन नागरिकांना फसवत सुटले आहेत. प्रलोभनाला बळी पडून एका ३५ वर्षीय व्यक्तीने चक्क ९० हजार २०० रुपये गमावल्याचा प्रकार ७ ऑगस्ट रोजी माहुली जहांगिर येथे उघड झाला. याप्रकरणी माहुली पोलिसांनी ८ ऑगस्ट रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
फिर्यादी हे नेहमी एका ऑनलाईन शॉपिंग साईटवरून खरेदी करत असतात. दरम्यान ते ७ ऑगस्ट रोजी दुपारी माहुुली येथे असराना त्यांना वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून कॉल आलेत. आपण नेहमीच ऑनलाईन खरेदी करीत असल्याने आपला लकी ड्रॉ मध्ये नंबर लागला असून, त्यात आपल्याला महागडी कार मिळणार असल्याची बातवणी करण्यात आली. ती मिळविण्यासाठी नोंदणी फी म्हणून ४ हजार रुपये भरावे लागतील, असेही सांगण्यात आले. त्यानुसार फिर्यादीने फोन पे द्वारे ४ हजार रुपये भरले. त्यानंतर नानाविध कारणे सांगून त्यांचेकडून अनुक्रमे १९ हजार २००, २५ हजार, ३२ हजार ५००, ९५०० असे एकूण ९० हजार २०० रुपये घेतले. मात्र कारबाबत कुठलिही माहिती दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.