न्यायालय परिसरात कारला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:18 PM2019-07-01T23:18:58+5:302019-07-01T23:19:46+5:30
नवीन कौटुंबिक न्यायालय परिसरात पार्किंगमधील एका कारमध्ये आग लागल्याने सोमवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास प्रचंड खळबळ उडाली. अग्निशमन पोहोचेपर्यंत कार पुढील बाजूने आगीच्या विळख्यात सापडून जळून खाक झाली होती. या घटनेमुळे न्यायालयातील वकील मंडळींची तारांबळ उडाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नवीन कौटुंबिक न्यायालय परिसरात पार्किंगमधील एका कारमध्ये आग लागल्याने सोमवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास प्रचंड खळबळ उडाली. अग्निशमन पोहोचेपर्यंत कार पुढील बाजूने आगीच्या विळख्यात सापडून जळून खाक झाली होती. या घटनेमुळे न्यायालयातील वकील मंडळींची तारांबळ उडाली होती.
वरिष्ठ विधिज्ञ बाळासाहेब गंधे यांचे चालक सुदाम विठ्ठल बान्ते यांनी कार (एमएच २७ एआर-२६१३) सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंगस्थळी उभी केली. तत्पूर्वी, विठ्ठल बांन्ते यांनी बाळासाहेब गंधे यांना न्यायालयात सोडले. कार पार्क होताच बॉनेटमधून धूर निघत असल्याचे बान्तेंच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी बॉनेट उघडून पाहिले. यावेळी आगीच्या ज्वाळा निघत होत्या. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे बान्तेही कारपासून दूर झाले.
कारला आग लागल्याचे पाहून न्यायालय परिसरातील प्रचंड गर्दी जमली. त्याच्या आजूबाजूला कार पार्क केल्या होत्या. त्यामुळे आगीच्या झळा अन्य कारपर्यंत पोहोचत होत्या. ही बाब लक्षात घेता तेथील काही नागरिकांनी गंधे यांच्या कारच्या आजूबाजूला असणाऱ्या दोन्ही कारच्या काचा फोडून त्या दूर सारल्या.
दरम्यान, पेटत्या कारच्या टायर फुटल्याने मोठा आवाज झाला आणि तेथे उपस्थित नागरिक जीव वाचविण्याच्या भीतीने सैरावैरा पळत सुटले. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान न्यायालय परिसरात पोहोचले आणि त्यांनी तत्काळ आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. काही वेळात आग विझविण्यात त्यांना यश मिळाले. मात्र, या आगीत गंधे यांच्या कारचा पुढील भाग भस्मसात झाली. या माहितीवरून काही न्यायाधीशांनी घटनास्थळाची पाहणी केली.
दोन कार बचावल्या
न्यायालय परिसरातील कारने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील जीवीशा घटकाचे सोयम खान व कुणाल काकडे यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. पेटत्या कारच्या आजूबाजूला वकील एस.बी. राऊत व कृष्णा जतारिया नामक व्यक्तीची कार होती. पेटत्या कारची झळ लागल्यामुळे दोन्ही कार पेटण्याची भीती होती. त्यामुळे नागरिकांनी दोन्ही कारच्या काचा फोडून त्या पुढे ढकलत नेल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पार्किंगस्थळी १० वाहने आगीच्या संकटातून बचावली.