आंबे पिकविण्यासाठी कार्बाईड
By admin | Published: April 24, 2015 12:15 AM2015-04-24T00:15:03+5:302015-04-24T00:15:03+5:30
आंबे पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर करणाऱ्या जुना कॉटन मार्केटमधील आंबे विक्रेत्याच्या दुकानावर...
अमरावती : आंबे पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर करणाऱ्या जुना कॉटन मार्केटमधील आंबे विक्रेत्याच्या दुकानावर गुरूवारी दुपारी १.३० वाजतादरम्यान अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून कारवाई केली.
बाजार समितीच्या जुन्या कॉटन मार्केटमध्ये घाऊक फळविक्रेत्यांची दुकाने आहेत. गुरूवारी या सर्व दुकानांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान महेशकुमार बानोमल या फळविक्रेत्याच्या ७० क्रमांकाच्या दुकानात तब्बल ३६० किलो आंबे कार्बाईडचा वापर करून पिकवित असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी फळविक्रेता रवी कन्हैयालाल गनवानी यांच्याकडून आंबा व कार्बाईड पावडरचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे.
तपासणी अहवाल आल्यानंतर संबंधितांविरूध्द अन्न सुरक्षा व मानद कायदा २००६ च्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. ही कारवाई अन्न, औषधी प्रशासन विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई, सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी जयंत वाणे, राजेश यादव व फरीद सिद्दीकी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणातील दोषींवर सहा वर्षांपर्यंत कारावास व पाच लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या कारवाईमुळे फळविक्रेत्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)