भरधाव मालवाहू वाहन उलटले; १९ शेतमजूर महिला जखमी, दोघी गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 11:27 AM2023-10-31T11:27:18+5:302023-10-31T11:30:36+5:30
चालकाविरुद्ध गुन्हा, मोर्शी तालुक्यातील तळणी येथील अपघात
मोर्शी (अमरावती) : मालवाहू वाहन उलटून झालेल्या अपघातात १९ महिला शेतमजूर जखमी झाल्या. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास तालुक्यातील तळणी येथे हा अपघात घडला. जखमींना मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. तर अन्य तीन गंभीर शेतमजुरांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
जखमींमध्ये मनीषा झिंगडे, साधना गोडसे, लता ढोले, सविता जुवारे, संगीता वाघ, आशा कुऱ्हाडे, इंद्रकला गोंडसे, ललिता शिरभाते, शांता बोकड, गीता नरवरे, संगीता धोटे, मीना भरनपुरे, रेखा वानखडे, मंगला खवले, कमला युवनाते, संगीता धोटे, लता ढोले, वर्षा कुऱ्हाडे, शालिनी मेंढे, वर्षा शिरभाते यांचा समावेश आहे. या ३० ते ६० वर्ष वयोगटातील महिला शेतमजूर पिंपळखुटा लहान येथील ईश्वर टिपरे यांच्या शेतात कापूस वेचण्यासाठी सोमवारी सकाळी श्याम दळवी यांच्या मालवाहू वाहनाने गेल्या होत्या.
कापूस वेचून झाल्यावर पिंपळखुटा लहान येथून तळणी मार्गाने त्या मोर्शी येण्यासाठी निघाल्या असता तळणी येथे वळण रस्त्यावर वाहन उलटले. जखमींना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे भरती करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार केल्यानंतर रेखा वानखडे, मंगला युवनाते व मनीषा झिंगडे या तिघींना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले.