निराधार आदिवासी निराधार मुलीचा सांभाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:14 AM2021-04-28T04:14:49+5:302021-04-28T04:14:49+5:30
वरूड : घरी अठराविश्वे दारिद्र्य व पतिनिधनाने विमनस्क अवस्थेत मुलीला घेऊन उपजीविका करणाऱ्या वरूड येथील मातेची मुंगसाजी महाराजच्या यात्रेमध्ये ...
वरूड : घरी अठराविश्वे दारिद्र्य व पतिनिधनाने विमनस्क अवस्थेत मुलीला घेऊन उपजीविका करणाऱ्या वरूड येथील मातेची मुंगसाजी महाराजच्या यात्रेमध्ये जात असताना १० वर्षांपूर्वी मोर्शी येथे ठाकरे दाम्पत्यासोबत भेट झाली. त्या मातेने आपल्या पोटच्या गोळ्याला प्रा. लीना व सतीश ठाकरे यांना दिले. त्या निराधार बालिकेचा सांभाळ करून या दाम्पत्याने तिला कला शाखेतून पदवीधर केले आणि आता योग्य स्थळ बघून कन्यादान केले.
वरूड येथील आठवडी बाजार परिसरात झोपडपट्टीमध्ये भीमराव पंधरे कुटुंबासह राहत होते. त्यांच्या निधनानंतर पत्नी मंदा आणि १४ वर्षांची मुलगी सुनीता दोघीच होत्या. भटकंती करून जीवन व्यतीत करणारी ती माता आपल्या चिमुकलीला घेऊन श्री मुंगसाजी महाराज पालखी पदयात्रेत निघून गेली. सदर पालखी मोर्शीत आली. तेथील प्रशांत कॉलनीमधील सतीश ठाकरे आणि लीना ठाकरे हे प्राध्यापक दाम्पत्याने पूजा-अर्चा केली. सदर महिलेने आपबीती सांगून पितृछत्र हरविलेल्या बालिकेला १० वर्षापूर्वी त्यांच्या पदरात टाकले. तेव्हा सुनीता ही दहावी नापास होती. तिला या दाम्पत्याने कला शाखेत पदवीधर करून स्वयंरोजगाराचे धडे देऊन स्वत:च्या पायावर उभे केले. सुनीताचे लग्नाचे वय झाल्याने योग्य उपवराचा शोध घेतला. लॉकडाऊन असताना प्रशासनाची परवानगी घेऊन अंजनसिंगी येथील ऋषीकेश उईके यांच्यासोबत वरूड येथे सुनीताच्या झोपडी वजा घरी आई मंदा हिच्या साक्षीने १६ एप्रिल रोजी छोटेखानी विवाह सोहळा पार पडला. आदिवासी समाजातील निराधार सुनीताचे कन्यादान ठाकरे दाम्पत्याने पालकत्व स्वीकारून केले. त्यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक होत आहे.