कारागृहात काेरोना नियंत्रणात, पाच संक्रमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:12 AM2021-04-16T04:12:40+5:302021-04-16T04:12:40+5:30
अमरावती : कोरोनाचा प्रकोप वाढत असताना येथील मध्यवर्ती कारागृहात कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. आजमितीला केवळ पाच बंदीजन आयसोलेशन कक्षात ...
अमरावती : कोरोनाचा प्रकोप वाढत असताना येथील मध्यवर्ती कारागृहात कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. आजमितीला केवळ पाच बंदीजन आयसोलेशन कक्षात उपचार घेत आहे. एकही कैदी कोरोना संसर्गाने गंभीर नाही. शासकीय सुपर स्पेशालिटी अथवा इर्विन रुग्णालयात उपचारार्थ भरती नसल्याची माहिती आहे.
राज्यात कोरोनाने मार्च २०२० मध्ये आगमन झाले. त्यानुसार १ मे २०२० ते जानेवारी २०२१ या दरम्यान कारागृहात १६५ कैदी संक्रमित आढळले होते. यापैकी एक कर्मचारी, एक कैदी असे दोघांचा कोरोनाने बळी घेतला. गृह विभागाच्या कारागृह प्रशासनाने कैदी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना संक्रमणाची लागण होऊ नये, यासाठी ३० एप्रिल २०२० पासून कठोर नियमावली लागू केली. यात अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्तव्य आळीपाळीने बजावावे लागले. सलग १५ दिवस कर्तव्य बजावल्यांतर पुढील १५ दिवस दुसरे अधिकारी, कर्मचारी कर्तव्य बजावत होते. तसेच नवीन कैदी कारागृहात प्रवेश करताना अगोदर कोरोना चाचणी, तात्पुरत्या कारागृहात १४ दिवस क्वारंटाईन त्यानंतर जुने कारागृहात प्रवेश दिला जातो. आजही हीच नियमावली सुरू आहे. प्रवेशद्धारावर सॅनिटायझर, हॅन्डवॉश, सुरक्षित शारीरिक अंतर, गर्दी टाळणे आदी नियमांचे तंतोतंत पालन करण्यात कारागृह प्रशासन यशस्वी ठरले आहे. त्यामुळे हल्ली १०३९ कैदी संख्या असताना केवळ पाच संक्रमित कैदी आढळून न येणे ही जमेची बाजू ठरत आहे. यात महिला कैदी २४ तर, १०१५ पुरुष कैदी बंदीस्त असल्याची माहिती आहे.
००००००००००००००००००
नियमित आरोग्य तपासणी
कारागृहातील दवाखान्यात बंदीजनांची नियमित तपासणी करण्यात येते. आतमध्ये स्वतंत्र दवाखाना असून, येथेच बंदीजनांवर प्राथमिक उपचार केला जातो. हल्ली कारागृहात सहा कैदी सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण आहेत. येत्या आठवड्यात या सहा बंदीजनांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. काही कैदी पोलीस कोठडी अथवा सुटीवर जात असल्याने त्यांच्यात नंतर कोरोनाची लक्षणे आढळून येत असल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकारी एस. आय. थोरात यांनी व्यक्त केला आहे.
---------------