उपसभापतीच्या समयसूचकतेने वाहक बचावले
By admin | Published: June 5, 2016 12:08 AM2016-06-05T00:08:19+5:302016-06-05T00:08:19+5:30
स्थानिक पंचायत समितीच्या उपसभापती रेखा नागोलकर यांच्या समयसूचकतेमुळे एसटी महामंडळाच्या वाहकाचे प्राण वाचण्यासोबत
नांदगाव खंडेश्वर : स्थानिक पंचायत समितीच्या उपसभापती रेखा नागोलकर यांच्या समयसूचकतेमुळे एसटी महामंडळाच्या वाहकाचे प्राण वाचण्यासोबत बसमधील प्रवाशांना दिलासा मिळाल्याची घटना अमरावती ते यवतमाळ मार्गावर शुक्रवारी घडली.
राळेगाव ते अमरावती राज्य परिवहन विभागाच्या एम.एच.१४, बी.टी.४३५७ ही बस शुक्रवारी नांदगावहून अमरावतीकडे ९ वाजता निघाली. बसचे वाहक मंगेश रामभाऊ कुबडे हे प्रवाशांना तिकिटे देत असताना भोवळ येऊन बेशुध्द झाले. हा प्रकार प्रवाशाच लक्षात येताच गोंधळ उडाला. प्रवाशांनी व बसचालकाने बस थांबवून वाहकाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. पण प्रतिसाद मिळाला नाही. याच बसमधून पं.स.च्या उपसभापती रेखा नागोलकर प्रवास करीत होत्या. त्यांनी त्यांच्याजवळील बाटलीतील थंड पाण्यात मिसळून ग्लुकोज वाहकाला पाजले. त्यामुळे त्यांना बरे वाटू लागले. बस धानोरा गुरव येथे पोहोचताच वाहकावर उपचार करण्यात आले. वाढते उष्णतामानामुळे हा प्रसंग ओढवला असावा. वाहकाला बरे वाटताच बस पुढील प्रवासाला निघाली. (तालुका प्रतिनिधी)