अमरावती विद्यापीठात विद्यार्थ्यांना विना अट कॅरी ऑन लागू

By उज्वल भालेकर | Published: September 4, 2024 06:02 PM2024-09-04T18:02:07+5:302024-09-04T18:02:40+5:30

Amravati : विद्यार्थी सेनेच्या आंदोलनाला यश, विद्या परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मान्य

Carry on is applicable to students in Amravati University without conditions | अमरावती विद्यापीठात विद्यार्थ्यांना विना अट कॅरी ऑन लागू

Carry on is applicable to students in Amravati University without conditions

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने शैक्षणिक सत्र २०२४-२५ या वर्षासाठी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना विना अट कॅरी ऑन लागू करण्यात आला आहे. कॅरी ऑनच्या मागणीसाठी विद्यार्थी सेनेच्या वतीने विद्यापीठात ३ सप्टेंबरला आंदोलन केले. यावेळी शेकडोच्या संख्येत उपस्थित विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी विद्यार्थ्यांना भेट देत त्यांची मागणी समजून घेतली तसेच विद्या परिषदेच्या बैठकीमध्ये कॅरी ऑनच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत द्वितीय व तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना कॅरी ऑन देण्यासंदर्भातील मागणी गेल्या अनेक दिवसांपासून विविध विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून करण्यात येत होती. विद्यापीठातील मूल्यांकन पद्धतीमध्ये दोष असल्याने विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. मूल्यांकनकर्ते चुकीच्या पद्धतीने मूल्यांकनामध्ये हलगर्जीपणा बाळगल्याने अभ्यास करूनही विद्यार्थी नापास झाल्याचे विद्यार्थी सेनेचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कॅरी ऑन देण्याची मागणी सातत्याने विद्यापीठाकडे लावून धरण्यात आली होती. परंतु विद्यापीठ प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने ३ सप्टेंबर रोजी विद्यापीठात विद्या परिषदेचे बैठक दरम्यान विद्यार्थी सेनेने विद्यापीठात ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत कॅरी ऑनचा प्रस्ताव मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी विद्यार्थी सेनेने घेतला होता. या आंदोलनाची दखल घेत कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी विद्यार्थी सेनेची मागणी मान्य केली. तसेच विद्या परिषदेचे सदस्य प्रा. प्यारेलाल सूर्यवंशी यांच्याकडून हा प्रस्ताव विद्या परिषदेत ठेवून तो सर्वानुमते मान्य करण्यात आला. दोन तासांनंतर स्वतः कुलगुरूंनी विद्या परिषदेमध्ये घेतलेला कॅरी ऑनचा निर्णय वाचून दाखवला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला आहे. कॅरी ऑनमुळे अनुत्तरित विद्यार्थ्यांना सशर्त पुढल्या वर्षांमध्ये तत्काळ प्रवेश मिळणार आहे. यावेळी आंदोलनात युवासेना पश्चिम विदर्भ विभागीय सचिव सागर देशमुख, विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश सोळंके, उपजिल्हाप्रमुख इमरान सय्यद, हर्षद धोटे, शहरप्रमुख कार्तिक डकरे, भाविक कांबळे, योगेश डहाके, ऋषिकेश हिंगणकर, वेदांत दांडगे, आयुष कुरडकर, अनिकेत चावरे, साहिल ढोले, भूषण मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होते.

Web Title: Carry on is applicable to students in Amravati University without conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.