अवैध धंदे आढळल्यास ठाणेदार नियंत्रण कक्षात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:44 PM2019-03-20T22:44:27+5:302019-03-20T22:44:46+5:30
लोकसभा निवडणूक काळात पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकल्यास संबंधित ठाणेदाराला तात्काळ नियंत्रण कक्षाशी संलग्न केले जाईल तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावून सिरीयस डिफॉल्ट रिपोर्ट (अहवाल) पोलीस महासंचालकांना पाठवला जाईल. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यासंबंधी आदेश जारी केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा निवडणूक काळात पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकल्यास संबंधित ठाणेदाराला तात्काळ नियंत्रण कक्षाशी संलग्न केले जाईल तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावून सिरीयस डिफॉल्ट रिपोर्ट (अहवाल) पोलीस महासंचालकांना पाठवला जाईल. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यासंबंधी आदेश जारी केले आहेत.
अमरावती ग्रामीण पोलीस दलात एकूण ३१ पोलीस स्टेशन व सात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येतात. लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळात अवैध धंदे, दारूविक्री, मटका तसेच ज्या धंद्यापासून गावात तसेच शहरात तणाव, वाद निर्माण होतील, असे धंदे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अवैध व्यवसाय चालू करण्यास सहकार्य तसेच असे अवैध धंदे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाच्या धाडसत्रात आढळून आल्यास संबंधित ठाणेदाराला तात्काळ नियंत्रण कक्ष तसेच इतर पोलीस ठाण्यात पाठवून नवीन ठाणेदाराची नियुक्ती केली जाईल. त्या पोलीस ठाण्याशी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावून सिरीयस डिफॉल्ट रिपोर्ट पोलीस महासंचालकाला जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सांगण्यात आले.
मागील काही दिवसांपासून आजारी रजेवर असलेले अधिकारी-कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर तात्काळ हजर होण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. गर्भवती महिला व जखमी पोलीस कर्मचारी यांचीसुद्धा यादी मागवली आहे. त्यांच्या रिक्त जागी नवीन कर्मचारी दिले जाणार आहेत.
एलसीबीची मोठी कामगिरी नाही
मागील काही महिन्यांपासून अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मोठी कारवाई दिसून येत नाही. ग्रामीण भागातही खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
येत्या दोन ते तीन दिवसांत नवीन विशेष पथकात चांगल्या अधिकारी-कर्मचाºयाची नेमणूक करून सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आळा घातला जाईल.
- दिलीप झळके, पोलीस अधीक्षक, अमरावती