मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, यशोमती ठाकूर कडाडल्या
By गणेश वासनिक | Published: April 24, 2023 03:30 PM2023-04-24T15:30:59+5:302023-04-24T15:36:12+5:30
खारघर येथील निष्पाप १४ श्रीसदस्यांचे मृत्युप्रकरण तापले
अमरावती : मुंबईच्या खारघर येथे १६ एप्रिल रोजी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे गौरविण्यात आले. मात्र, या सोहळ्यात राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे १४ श्रीसदस्यांचा मूत्यू झाला. ही घटना गंभीर आणि मनाला वेदनादायी असून, याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी रोखठोक भूमिका राज्याच्या माजी महिला व बाल कल्याण मंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी पत्रपरिषदेतून केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार शहर, जिल्हा कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी खारघर येथील सदोष मनुष्यवध प्रकरणी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याबाबतची भूमिका मांडली. तर याबाबतचे निवेदन राज्यपाल रमेश बैस यांना देण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख यांनी दिली. दरम्यान ॲड. यशेामती ठाकूर यांनी घारघर येथील शाही मेजवानीचे छायाचित्र दाखविताना ‘नेत्यांची एसीमध्ये शाही मेजवानी, तर श्रीसदस्यांनी भर उन्हात छावणी’ असे म्हणत राज्य सरकारवर ताशेरे ओढले. या घटनेत नेमके किती जणांचे मृत्यू झाले,याची अधिकृत आकडेवारी जाहीर करावी,अशी मागणी त्यांनी केली.
मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख नव्हे तर एक कोटी रूपयांची मदत करावी. कारण या साेहळ्याचा खर्च १३ कोटी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे श्रीसदस्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. श्रीसदस्यांसाठी ना पाणी, ना मंडप, ना औषधोपचाराचीसोय होती, अशी टीका त्यांनी केली.
खारघर येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. निष्पाप श्रीसदस्यांच्या मृत्युप्रकरणी शिंदे, फडणवीसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतांच्या कुटुंबीयांना न्याय प्रदान करावी, अशी भूमिका आमदार ॲड. ठाकूर यांनी मांडली. पत्रपरिषदेला कॉंग्रेसचे जिल्हा बबलु देशमुख, आमदार बळवंत वानखडे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुधाकर वानखडे, प्रदेश प्रवक्ते मिलिंद चिमोटे, माजी महापौर विलास ईंगोले, भय्या पवार आदी उपस्थित होते.