फोनवर शिवीगाळ झाली अन् नातेवाइकांनी सचिनला संपवले; ४ अटक, १ फरार
By प्रदीप भाकरे | Published: November 1, 2023 07:17 PM2023-11-01T19:17:13+5:302023-11-01T19:17:27+5:30
वलगाव पोलिसांत सात जणांविरुद्ध गुन्हा
अमरावती : वलगाव येथील अशोकनगर बुद्धविहाराजवळ मंगळवारी रात्री घडलेल्या हत्येप्रकरणी मृताच्या एकूण सात नातेवाइकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पैकी चार आरोपींना अटक करण्यात आली. तर एक जण फरार आहे. तर दोघे विधिसंघर्षित बालक आहेत. सचिन भारत गवई (२५, रा. हातखेडा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताचे वडील भारत गवई (रा. हातखेडा, ता. भातकुली) यांच्या तक्रारीवरून १ नोव्हेंबर रोजी सकाळी दोनच्या सुमारास गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
याप्रकरणी, नागेश दीपक पंडित (२५), साहिल अमर तसरे (२१), रोहित रामसिंग सोळंके (१८) व अजय मेश्राम (२२, सर्व रा. वलगाव) यांना अटक करण्यात आली, तर गणेश दीपक पंडित (२०) हा अटकेपासून दूर आहे. यातील ज्या दोन अल्पवयींनाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, ते दोघेही १७ वर्षांचे आहेत. यातील फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. नागेश पंडित व सचिन गवई या दोघांमध्ये फोनवर शिवीगाळ केल्याचे कारणावरून वाद झाला. फिर्यादी भारत गवई व सचिन हे आरोपींना समजावण्यासाठी वलगाव येथील त्यांच्या घरी जात असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्या बापलेकास शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपींनी सचिनला फोन करून भेटायला बोलावले होते.
आरोपी नागेश पंडित याने सचिनवर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या सचिनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यामुळे काही काळ वलगावातील अशोकनगर भागात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत पंचनामा केला. मृतदेह शवविचच्छेदनासाठी पाठविला. तथा आरोपींना पकडण्यासाठी तत्काळ पोलिस पथके रवाना केली. वलगाव पोलिसांनी त्वरेने आरोपींना पकडण्यात यश मिळविले.
मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहा जणांना ताब्यात घेऊन चौघांना अटक करण्यात आली. दोघे विधिसंघर्षित बालक असल्याने त्यांना बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले.- सुरेंद्र अहेरकर, ठाणेदार, वलगाव