सहा महिन्यांच्या बाळासह मातेची आत्महत्या प्रकरणात पती भासऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:13 AM2021-07-30T04:13:40+5:302021-07-30T04:13:40+5:30
वरूड : तालुक्यातील ढगा येथील २८ वर्षीय महिलेने सहा महिन्यांच्या मुलीसह इस्माईलपूर शिवारात विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा ...
वरूड : तालुक्यातील ढगा येथील २८ वर्षीय महिलेने सहा महिन्यांच्या मुलीसह इस्माईलपूर शिवारात विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची हृदयाची थरकाप उडविणारी घटना गत शुक्रवारी घडली. याप्रकरणात आईने मुलीची हत्या केल्याचा गुन्हा मृताविरुद्ध दाखल झाला होता. चौकशीअंती मृताचे भावाच्या फिर्यादीवरून पती आणि भासऱ्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत असल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले.
मृत महिलेचे नाव प्रियंका मनोहर धोटे (२८), बालिकेचे नाव आरुषी ऊर्फ स्वरा मनोहर धोटे (६ महिने, दोन्ही रा. ढगा) असे आहे. मृत महिला ही सहा महिन्याच्या मुलीसह २२ जुलैला दुपारी ४ वाजता घरून निघून गेली होती. ती परत आली नाही म्हणून नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र, आढळून आली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी इस्माईलपूर शिवारात जनार्दन घोरमाडे यांच्या शेतातील विहिरीत मातेसह चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृत मातेविरुद्ध मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल केला होता, तर मृत प्रियंकाचा भाऊ पीयूष सुरेश काकडे (२३ रा. लोणी) यांनी दिलेल्या तक्रारीत प्रियंकाचा रितीरिवाजानुसार २७ जुलै २०१६ रोजी मनोज धोटे याचेसोबत लग्न झाले. एकत्र कुटुंबात ढगा येथे राहत होते. परंतु काही दिवसात मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन माहेरून ६० हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता. घटनेच्या दिवशी पती मनोज आणि भासरे प्रवीण धोटे यांनी पैसे आणत नाही म्हणून मानसिक व शारीरिक त्रास देऊन मारझोड केली. यामुळे जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली असून, आत्महत्येस पती आणि भासरे जबाबदार असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यावरून ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय हेमंत चौधरी, सुनील पाटील, उपनिरीक्षक योगेश हिवसे, जमादार उमेश बुटले, दीपक पंधरे, सुमित तिळेकर यांचे पथकाने चौकशी करून पती मनोज धोटे आणि भासरे प्रवीण धोटेविरुद्ध भादंवि कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.