रेल्वेत मोबाईल चोरी गेल्यास टीसी दाखल करून घेणार गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 05:00 AM2021-12-08T05:00:00+5:302021-12-08T05:00:58+5:30
धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशी लांबचा प्रवास करतात. किंबहुना, प्रवाशांकडील वस्तू अथवा मोबाइल चोरीला गेल्यास रेल्वेखाली उतरून पोलिसात तक्रार देणे शक्य होत नाही. त्यामुळे चोरीच्या घटनेची नोंद रेल्वे पोलिसात करण्यात येत नाही. तक्रार नाही तर तपास नाही, असा रेल्वे पोलिसांचा कारभार आहे. मात्र, आता रेल्वेत वस्तू, मोबाइल चोरीला गेल्यास प्रवाशांना पोलिसात जाऊन तक्रार न करता टीसींकडे याबाबत तक्रार करावी लागेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बरेचदा रेल्वे गाड्यांमध्ये चोरीच्या घटना झाल्यानंतरही याबाबत तक्रार दाखल होत नाही. विशेषत: मोबाईल चाेरीच्या घटना सातत्याने घडत असतानाही गुन्हे दाखल होत नाहीत. मात्र, आता नव्या नियमानुसार रेल्वेत मोबाइल चोरी गेला, तर टीसी गुन्हा दाखल करून घेणार आहे. प्रवाशांची तक्रार लिहून घेण्याची जबाबदारी टीसींकडे आली आहे.
धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशी लांबचा प्रवास करतात. किंबहुना, प्रवाशांकडील वस्तू अथवा मोबाइल चोरीला गेल्यास रेल्वेखाली उतरून पोलिसात तक्रार देणे शक्य होत नाही. त्यामुळे चोरीच्या घटनेची नोंद रेल्वे पोलिसात करण्यात येत नाही.
तक्रार नाही तर तपास नाही, असा रेल्वे पोलिसांचा कारभार आहे. मात्र, आता रेल्वेत वस्तू, मोबाइल चोरीला गेल्यास प्रवाशांना पोलिसात जाऊन तक्रार न करता टीसींकडे याबाबत तक्रार करावी लागेल. त्यानंतर चोरीच्या घटनेची तक्रार टीसी करणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे प्रवाशांच्या वेळ वाचणार आहे. तपासही जलद गतीने होणार आहे.
कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये दाखल करता येतो गुन्हा
रेल्वेत चोरी झाल्यास टीसीकडे असलेल्या अर्जाच्या आधारे प्रवाशांची माहिती घेण्यात येते. किंबहुना, चोरीची घटना घडल्यास टीसी रेल्वे पोलिसांशी संपर्क करतात. त्यानुसार, संबंधित डब्यात पोलीस पोहोचून स्वत: गुन्हा नोंदवून घेतात. त्यानंतर, प्रवाशांच्या व्हॉट्सॲप, ई-मेलवर एफआयआरची प्रत पाठविली जाते. आरपीएफ, जीआरपीही गुन्हा दाखल करू शकतात. प्रवासी ठरवेल त्या रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवू शकतो.
- अजितसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक, बडनेरा रेल्वे.
- आता प्रवासी मर्जीनुसार कोणत्याही रेल्वे पोलिसात गुन्हा नोंदवू शकतात. तेथे झीरो गुन्हा दाखल करून, त्यानंतर ज्या भागात चोरी झाली, त्या रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची फाईल तपासासाठी पाठविली जाते.
- चोरी झाल्यास धावत्या गाडीतच प्रवासी टीसीकडे तक्रार करू शकतात. त्यानंतर टीसी स्वत: प्रवाशांची तक्रार रेल्वे पोलिसात दाखल करू शकतात. त्यानंतर गुन्हा नोंदविल्याची प्रत प्रवाशांकडे पाठविण्याची व्यवस्था आहे.
कोरोनाकाळात घटल्या चोरीच्या घटना
कोरोनाकाळात रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण तिकिटांशिवाय प्रवास नाही, अशी नियमावली होती. त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी ओसरली होती. कठोर नियमावलीमुळे ये-जा कमी झाल्याने चोरीच्या घटनाही घटल्या. बडनेरा रेल्वे स्थानकावरील पोलीस ठाण्यात सन २०१७ मध्ये २९८, सन २०१८ मध्ये ५८५, सन २०२० मध्ये १०४, तर सन २०२१ मध्ये आतापर्यंत ९० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हल्ली रेल्वेत जीआरपी, आरपीएफ जवानांची गस्त वाढल्याने चोरीच्या घटना मंदावल्या आहेत.
प्रवाशांचा वेळ वाचणार, तपासही जलद
आता रेल्वे गाड्यात प्रवाशांचे वस्तू, मोबाईल चोरीला गेल्यास प्रवाशांना थेट पोलिसांत जाऊन गुन्हा नोंदविण्याची गरज नाही. चोरी झाल्याचे प्रवाशांनी टीसीला कळविल्यास तेच गुन्हा दाखल करून घेतील, अशी व्यवस्था आहे. रेल्वेत जीआरपी, आरपीएफही घटनास्थळी पोहोचून गुन्हा नोंदवतील, अशी नवीन व्यवस्था आहे.