उपबाजारात ‘सेस’ चोरी!
By admin | Published: October 28, 2015 12:27 AM2015-10-28T00:27:33+5:302015-10-28T00:27:33+5:30
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थानिक उपबाजारपेठेत कमी माल दाखवून गेटपास मागणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या मुलाने संबंधित कर्मचाऱ्याशी वाद घातला.
अमरावती बाजार समितीची कारवाई : व्यापाऱ्याला मागितला खुलासा
बडनेरा : अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थानिक उपबाजारपेठेत कमी माल दाखवून गेटपास मागणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या मुलाने संबंधित कर्मचाऱ्याशी वाद घातला. ‘सेस’ चोरीच्या या प्रकारात बाजार समिती प्रशासनाने संबंधित व्यापाऱ्यांकडून घडलेल्या प्रकाराचा खुलासा मागितला आहे. हा प्रकार सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजारापेठ बडनेऱ्यात आहे. या उपबाजार समितीशी तब्बल १०० खेडी संलग्न आहेत. सध्या उपबाजार समितीमध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. सोमवारी उशिरा रात्री उपबाजार समितीत लिलावात खरेदी केलेले सोयाबीन दिनेश जैन नामक व्यापारी सी.जी.- ०४- एल- ०९०४ क्रमांकाच्या ट्रकमध्ये भरून नेत होते. यावेळी व्यापाऱ्याच्या मुलाने गेटपास देणाऱ्या कर्मचाऱ्यास १६० पोत्यांची गेटपास मागितली. मात्र, अधिक माल असल्याने कर्मचाऱ्याने नकार दिला. त्यानंतर व्यापारीपुत्राने त्याच्याशी वाद सुरू केला. पश्चात ट्रकमधील माल मोजला असता २१४ पोते आढळून आले. बाजार समिती प्रशासनाने याबाबत व्यापाऱ्याला लेखी खुलासा मागितला आहे. सोयाबीनने भरलेला ट्रक रात्री उपबाजार समितीच्या आवारातच ठेवण्यात आला. दुसऱ्या दिवशी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रफुल्ल राऊत, सचिव भूजंग डोईफोडे, विभागप्रमुख आर.पी.वानखडे यांच्यासमक्ष ही कारवाई करण्यात आली. खुलासा आल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)