पट्टीबंधक डॉक्टर अन् सफाई कामगार कॅशियर, रुग्णांंची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 10:36 PM2019-08-05T22:36:08+5:302019-08-05T22:36:30+5:30
धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली वसाड येथे आरोग्य यंत्रणेने अॅलोपॅथिक दवाखाना वाऱ्यावर सोडल्याने पट्टीबंधक हा डॉक्टर आणि सफाई कामगार हा कॅशियर झाला आहे. येथे येणारे किरकोळ आजाराचे रुग्ण दोघांच्या ज्ञानावर आधारित उपचारावर अवलंबून असतात. याकडे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कावली वसाड : धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली वसाड येथे आरोग्य यंत्रणेने अॅलोपॅथिक दवाखाना वाऱ्यावर सोडल्याने पट्टीबंधक हा डॉक्टर आणि सफाई कामगार हा कॅशियर झाला आहे. येथे येणारे किरकोळ आजाराचे रुग्ण दोघांच्या ज्ञानावर आधारित उपचारावर अवलंबून असतात. याकडे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे.
अॅलोपॅथिक दवाखान्यात डॉक्टर, आरोग्य सेवक/सेविका उपलब्ध नाहीत. त्यामुळे पट्टीबंधक व सफाई कामगार आरोग्यसेवेची ‘जबाबदारी’ वाहत आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत हा दवाखाना येतो. साथीच्या आजारांमुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असताना, केवळ गोळ्यांवरच त्यांची बोळवण या कर्मचाऱ्यांकडून होत आहे. त्या ठिकाणी आरोग्य सेविका डॉक्टर व कर्मचारी कधी आपल्या कामावर दिसत नसल्याने रात्री-अपरात्री मिळेल त्या वाहनाने धामणगावसारख्या ठिकाणी खासगी उपचाराकरता रुग्णांना घ्यावे लागत आहेत.
फार्मासिस्ट पाहिला नाही
दवाखान्यात वसाड, कावली व गव्हा निपाणी येथील ग्रामस्थ उपचार करण्यासाठी येतात. परंतु, आरोग्य कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी झाली आहे.चुकीची औषधे दिल्याने रुग्णांना अपाय होऊन मृत्यूही ओढवू शकतो. परंतु, सदर दवाखान्यामध्ये फार्मासिस्ट कधीही पाहिला नसल्याचे दवाखान्यात उपस्थित नागरिकांनी सदर प्रतिनिधीला सांगितले.
एकाच वेळी दवाखाना उघडा
सदर दवाखाना कित्येक वर्ष बंद अवस्थेत पडलेला होता. ‘लोकमत’ने प्रशासनाला जागे करून हा दवाखाना सुरू केला. काही दिवस कारभार सुरळीत चालला. परंतु, आता कर्मचारी मनमानी करीत आहेत. सदर दवाखाना दोन वेळा असला तरी आता केवळ सकाळीच उघडा राहतो.
जनतेला सर्वांगीण सेवा मिळावी, चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आरोग्य कर्मचाºयांनी हजर राहिले पाहिजे.
- नंदा कावरे,
सरपंच