जात 'हिंदू कोळी' अन् जमात प्रमाणपत्र 'टोकरे कोळी'

By गणेश वासनिक | Published: November 14, 2023 01:49 PM2023-11-14T13:49:52+5:302023-11-14T13:50:36+5:30

आदिवासी समाजात आरक्षणासाठी घुसखोरी, धुळे समितीकडून जमातीचे प्रमाणपत्र रद्द करून जप्त

caste hindu koli and tribe certificate tokare koli | जात 'हिंदू कोळी' अन् जमात प्रमाणपत्र 'टोकरे कोळी'

जात 'हिंदू कोळी' अन् जमात प्रमाणपत्र 'टोकरे कोळी'

गणेश वासनिक, अमरावती : देशाचे राष्ट्रपती यांनी घोषित केलेली अनुसूचित जमातीची यादी 'जशी आहेत तशीच' वाचणे व लिहिणे आवश्यक आहे. त्यानुसार जमातीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक असताना मात्र जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील उपविभागीय अधिकाऱ्याने जात 'हिंदू कोळी' असताना 'टोकरे कोळी' अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशाल पोपट सपकाळे हे जळगाव जिल्ह्यामधील रावेर तालुक्यातील सुनोदे गावचे रहिवासी आहे. उपविभागीय अधिकारी फैजपूर यांनी त्यांना १५ सप्टेंबर २०२२ रोजी 'टोकरे कोळी' जमातीचे प्रमाणपत्र दिले आहे. त्याचा आऊटवर्ड क्रमांक ३९६२१३१६९१२ असा आहे. या संदर्भात राहूल सुकदेव चव्हाण यांनी समितीकडे तक्रार केली होती.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती धुळे यांच्या नजरेत ही फसवेगिरी आली असून ती सिद्ध झाल्यामुळे समितीने ४ ऑक्टोबर २०२३ रोजी विशाल पोपट सपकाळे यांचे 'टोकरे कोळी' जमातीचे प्रमाणपत्र रद्द व जप्त केले आहे. राज्यात कोळी व सूर्यवंशी कोळी ह्या जाती विशेष मागास प्रवर्गामध्ये (एसबीसी) समाविष्ट आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ जून १९९५ रोजी शासन निर्णयान्वये विशेष मागास प्रवर्गातील जातीसमुहाची यादी प्रकाशित केलेली असून अनुक्रमांक ४ वर कोळी तत्सम जातीसमुहाची वर्गवारी केलेली आहे, हे विशेष.

जिल्हा पोलिस अधिक्षक करणार कारवाई

धुळे येथील जातपडताळणी समितीने जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांना संबंधिताने अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवर सेवा प्रवेश मिळविल्यामुळे अधिनियम २००० च्या कलम १० व ११ नुसार कारवाई करण्यासाठी प्राधिकृत केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सिव्हिल अपिल क्र. ८९२८/२०१५ दि. ६ जुलै २०१७ कडे लक्ष वेधण्यात आले आहे.

कोणत्याही जातीची उपजात लावण्याचा किंवा संबोधन करण्याचा कायदेशीर अधिकार फक्त भारतीय संसदेलाच आहे. त्याशिवाय अन्य कोणत्याही प्राधिकरणाला असा अर्थ लावण्याचा अधिकार नाही. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद कटवारे विरुद्ध राज्य शासन प्रकरणी निरीक्षण नोंदविले आहे. तसेच वेळोवेळी दिलेल्या न्यायनिर्णयात स्पष्ट केले आहे. - प्रफुल कोवे, जिल्हाध्यक्ष ट्रायबल फोरम यवतमाळ.

Web Title: caste hindu koli and tribe certificate tokare koli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.