मेळघाटाच्या व्याघ्र प्रकल्पातील गावांत गुरांना लम्पीची लागण; अतिसंरक्षक भागातील बायसनचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2022 02:49 PM2022-09-15T14:49:30+5:302022-09-15T14:52:27+5:30
सेमाडोह येथील पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टरांअभावी पांढरा हत्ती ठरला आहे.
नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) : गाय, बैल यांच्यावर आलेला लम्पी आजार मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित सेमाडोह हरीसाल माखला परिसरातील गावात आढळला. या पट्ट्यात शेकडोंच्या संख्येने रानगवे आहेत. रानगवा गायवर्गीय असल्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे. सेमाडोह येथील पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टरांअभावी पांढरा हत्ती ठरला आहे.
जिल्ह्यात धारणी, चिखलदरा तालुक्यात लम्पी आजाराने पाय पसरले असून, त्याची लागण आता शहरी भागानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित समजल्या जाणाऱ्या गावांमध्ये असलेल्या गाय, बैलांवर सेमाडोह, माखला, हरिसाल परिसरात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना गुरांवर मंगळवारी रात्री तपासणीदरम्यान आढळून आली आहे.
वैराट ते हतरू येथे शेकडोंच्या संख्येने रानगवे
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल आणि सिपना वन्यजीव विभागातील वैराट, ढाकणा, हरिसाल, कोलकास, सेमाडोह, रायपूर, हतरू या अतिदुर्गम भागातील जंगलात शेकडोंच्या संख्येने रानगवे आहेत. रानगवा हा गायवर्गीय प्राणी असल्याने लम्पीसारख्या आजाराची भीती अधिक असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दवाखाना मोडकळीस, लसीकरण नाही
जिल्ह्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या १६ ते १७ जागा रिक्त आहेत. त्याचा फटका मेळघाटलासुद्धा बसला आहे. सेमाडोह येथील दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी नाही. एक परिचर आहे. ना औषध, ना लसीकरण, केवळ पांढरा हत्ती उभा आहे. इमारत पूर्णतः मोडकळीस आली आहे. चिखलदरा येथील अधिकाऱ्यांवर पदभार आहे. त्यामुळे या परिसरात लागण झाली किंवा नाही, याची माहिती पोहोचू न शकल्याने बुधवारी दुपारपर्यंत लसीकरणाला सुरुवात झाली नव्हती.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गावांमध्ये लसीकरणा करून जनजागृतीच्या सूचना दिल्या. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संपर्क व व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. रानगवा गायवर्गीय प्राणी आहे.
- मनोजकुमार खैरनार, विभागीय वनअधिकारी, मेळघाट व्याघ्र प्रकल्प
जिल्ह्याला साठ हजार लसी प्राप्त झाल्या. लसीचा तुटवडा आहे. जेथे लागण झाली, तेथे तत्काळ कॅम्प घेऊन लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यात श्रेणी-१ ची १६ पदे रिक्त आहेत. सेमाडोह परिसरात तत्काळ माहिती करून लसीकरणाला सुरुवात केली जाईल.
- पुरुषोत्तम सोळंके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, अमरावती