अमरावतीकरांची नाडी पकडली; आरोग्यासाठी नवे मोहल्ला क्लिनिक, महापालिकेचा अर्थसंकल्प ८५० कोटींचा
By प्रदीप भाकरे | Published: March 28, 2023 07:33 PM2023-03-28T19:33:49+5:302023-03-28T19:37:51+5:30
शहरातील १३ शहरी आरोग्य केंद्र व नव्याने उभारल्या जाणाऱ्या २९ हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटरसह अमरावतीकरांना मोहल्ला पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा
अमरावती :
शहरातील १३ शहरी आरोग्य केंद्र व नव्याने उभारल्या जाणाऱ्या २९ हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटरसह अमरावतीकरांना मोहल्ला पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा मिळणार असल्याची घोषणा प्रशासक तथा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी मंगळवारी केली. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा सुमारे ८४९ कोटी ७१ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मांडताना आयुक्तांनी अमरावतीकरांच्या शाश्वत विकासासाठी नव्या व कल्पक योजनांचा संकल्प देखील सोडला. यातील सर्वाधिक ३६ टक्के खर्च हा आरोग्य व स्वच्छतेवर होणार असल्याचे आयुक्त म्हणाले.
दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर सुमारे तीन कोटी रूपये खर्चून या पाॅलिक्लिनिकची उभारणी केली जाणार आहे. तेथे तज्ज्ञ डॉक्टर सेवा देतील. आयुक्त डॉ. आष्टीकर यांनी मंगळवारी सलग दुसऱ्यांदा प्रशासक म्हणून महापालिकेचा जंबो अर्थसंकल्प मांडला. त्यात ४० कोटींवर स्थिरावलेल्या मालमत्ता करात तब्बल ११९ कोटींची वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. अर्थसंकल्प मांडताना उपायुक्त डाॅ. मेघना वासनकर व डॉ. सीमा नैताम, मुख्य लेखापरीक्षक राम चव्हाण, शहर अभियंता इकबाल खान, एडीटीपी घनश्याम वाघाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, पर्यावरण अधिकारी महेश देशमुख, प्रभारी कॅफो प्रवीण इंगोले, महिला बालविकास अधिकारी नरेंद्र वानखडे, सहायक आयुक्त भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, योगेश पिठे, तौसिफ काझी व श्रीरंग तायडे, सहायक पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. सचिन बोंद्रे आदी उपस्थित होते.
अशी आहे नवसंकल्पना बजेट
ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी योजना : ५० लाख
महिला बचत गटासाठी माॅल : एक कोटी
नवीन नाट्यगृह, कलादालन : एक कोटी
महिला, तृतीयपंथीयांसाठी शाैचालय : ५० लाख
सार्वजनिक प्रसाधनगृह उभारणे : १.५० कोटी
वातानुकूलित ड्रग सेंटर उभारणी : तीन कोटी
श्वान उत्पत्ती नियंत्रण कार्यक्रम : एक कोटी
डेकोरेटिव्ह लॅम्प : ५० लाख
आदर्श रस्ता विकास : १८ कोटी
ई वाहन खरेदी : २५ लाख
पॉलिक्लिनिक उभारणी : तीन कोटी
मालमत्ता करांत ११९ कोटींची वाढ
सन २०२२/२३ मध्ये शहरातील एकूण २.९८ लाख मालमत्तांचे नंबरिंग झाले असून, पैकी सुमारे दाेन लाख ९१ हजार मालमत्तांची कर सर्वेक्षण झाले आहे. त्यातून सन २०२३/ २४ मध्ये पालिकेच्या मालमत्ता कर मागणीमध्ये तब्बल ११९ कोटींची वाढ होणार आहे. थकबाकी वगळून फ्रेश ४० कोटींची मागणी पाहता पुढील आर्थिक वर्षात एकूण मागणी १६० कोटींवर जाणार आहे. विशेष म्हणजे, सर्वेक्षणामध्ये तब्बल एक लाख ३७ हजार मालमत्ता नव्याने कराच्या कक्षेत येणार आहे.
पुढील आर्थिक वर्षात मालमत्ता करांमधून येणाऱ्या उत्पन्नामध्ये सुमारे ११९ कोटींची वाढ अपेक्षित आहे. शहराच्या शाश्वत विकासासाठी काही नवसंकल्प सोडले आहेत. त्या नव्या योजनांसाठी भरीव तरतूददेखील केली आहे.
- डॉ. प्रवीण आष्टीकर, आयुक्त, महापालिका