सावधान!‘ फेसबुक’च्या ‘मार्केट प्लेस’वर खरेदी करताना होऊ शकते फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:13 AM2021-04-09T04:13:42+5:302021-04-09T04:13:42+5:30
अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिक ऑनलाईन खरेदीवर भर देत आहे. मात्र, याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत असून, ...
अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिक ऑनलाईन खरेदीवर भर देत आहे. मात्र, याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत असून, ग्राहकांना वेगवेगळी आमिषे दाखवून फसवणूक झाल्याच्या काही घटना अलीकडे निदर्शनास आल्या आहेत. ‘फेसबुक’च्या ‘मार्केट प्लेस’वर जाऊन खरेदी करताना सावधान राहा. अन्यथा आपली फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अर्लट शहर सायबर पोलिसांनी दिला आहे.
नागरिक फेसबुक’च्या ‘मार्केट प्लेस’च्या साईडवर जाऊन सर्च करून विविध वस्तुंची खरेदी विक्री करीत आहेत. मात्र, सायबर गुन्हेगार एखादी वस्तू विक्रीस आहे, अशी जाहिरात टाकतात. त्याखाली त्याचा मोबाईल क्रमांक दिला जातो. नागरिक सदरची जाहिरात पाहून ती वस्तू खरेदीकरिता दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करतात. मात्र, संपर्क करताच सायबर गुन्हेगार मी आर्मीत आहे. माझी बदली झाली असल्यामुळे मला ती वस्तू लवकर विकायची आहे, अशी बतावणी करून नागरिकांचा विश्वास संपादन करून व्यवहार करतात. सर्वप्रथम काही रक्कम त्यांच्या खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर करायला सांगतात. उर्वरित रक्कम वाहन घरी पोहचल्यावर पाठवायची, असे सांगितले जाते. येथूनच लोकांच्या फसवणुकीची सुरुवात होत असल्याचे सायबर पोलिसांच्या प्राथमिक तपासात निरदर्शनास आले आहे. मात्र नागरिकांनी ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कुठलेही वाहन नागिरकांच्या घरापर्यंत येत नाही. ग्राहकाने आरोपीशी संपर्क केल्यानंतर वेगवेगळी कारणे सांगितले जाते. पुन्हा लोकांना रक्कम भरण्यास सांंगून फसवणूक केली जाते. त्यामुळे फेसबुकच्या मार्केट प्लेसवरून खरेदी-विक्री करताना सतर्कता बाळगावी. कुठल्याही प्रकारे ऑनलाईन रक्कम पाठवू नये, बँक खात्याची माहिती देऊ नये, वस्तू हातात आल्यानंतर पैशाचा व्यवहार करावे, असे सायबर पोलिसांनी सांगितले.
कोट
सायबर गुन्हेगारी वाढत आहे. फेसबुकच्या मार्केट प्लेसवरून ऑनलाईन खरेदी केल्यानंतर फसवणूक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना नागरिकांनी सतर्कता बाळगावी. वस्तू घरापर्यंत येईस्तोवर पैशाचा व्यवहार करू नये.-
सीमा दाताळकर, पोलीस निरीक्षक, सायबर सेल