सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना आता पाच ऐवजी सहा विषय
By Admin | Published: March 17, 2017 12:12 AM2017-03-17T00:12:47+5:302017-03-17T00:12:47+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पाच ऐवजी सहा विषयांची
अमरावती : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पाच ऐवजी सहा विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे. नेहमीच्या पाच विषयांच्या जोडीने व्होकेशनल विषयाचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. सन २०१७-१८ याशैक्षणिक सत्रापासून यानिर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
सध्या सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम आणि द्वितीय भाषा, विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र याविषयांची परीक्षा द्यावी लागते. पुढील शैक्षणिक सत्रापासून परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. यंदाच्या सत्रापासून व्होकेशनल या सहाव्या विषयाची परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्यांतर्गत सीबीएसईने हा बदल केला आहे. विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या तीनपैकी एका विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास सहाव्या विषयाचे गुण ‘टॉप ५’मध्ये गृहित धरण्यात येतील. मात्र, अनुत्तीर्ण झालेल्या विषयाची पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध असेल.
परीक्षेतून ४१ विषय वगळले
अमरावती : प्रत्येक विषयासाठी १०० गुण राहणार असून त्यापैकी ५० गुण बोर्डाच्या लेखी परीक्षेसाठी तर उर्वरित ५० गुण प्रात्यक्षिक परीक्षांसाठी दिले जातील, असे सीबीएसईने जाहीर केले आहे. सहावा वैयक्तिक विषय निवडण्यासाठी एकूण १३ पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. दहावीच्या तंत्रज्ञान, सुरक्षा, आॅटोमोबाईल तंत्रज्ञान, पर्यटन आदी विषयांचा समावेश राहणार आहे.
ऐच्छिक म्हणून गणले जाणारे तब्बल ४१ विषय सीबीएसईने वगळले आहेत. या विषयांकरिता अत्यंत कमी संख्येने विद्यार्थ्यांची नोंदणी होत असल्याने हे विषय अभ्यासक्रमातून वगळण्यात आले आहेत. पुढील शैक्षणिक सत्रापासून हा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)