अमरावती, बडनेरा स्थानकांवर सीसीटीव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 01:15 AM2018-02-02T01:15:53+5:302018-02-02T01:16:30+5:30
रेल्वे स्थानकावर होणाºया घातपाती कारवाया, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आता बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. भुसावळ मध्य रेल्वे प्रबंधकांकडे त्याअनुषंगाने ८० कॅमेरे मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेल्वे स्थानकावर होणाºया घातपाती कारवाया, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आता बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. भुसावळ मध्य रेल्वे प्रबंधकांकडे त्याअनुषंगाने ८० कॅमेरे मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
रेल्वे प्रवाशांना अधिकाअधिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीने रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रबंधकांनी घेतला आहे. यात अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. येत्या अर्थसंकल्पात रेल्वे गाड्या आणि स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत लागणारा निधी मंजूर होईल. मात्र, तत्पूर्वी मध्य रेल्वे मुंबई प्रशासनाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील रेल्वे स्थानकांचा सीसीटीव्ही बसविण्याबाबत लेखाजोखा मागविला आहे. दर दिवसाला प्रवाशांची मोठ्या संख्येने वाहतूक होत असलेल्या रेल्वे स्थानकांवरच सीसीटीव्ही बसविणे प्रस्तावित आहे. त्यानुसार अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे स्थळ निश्चित करण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा दलाने पाठविलेल्या प्रस्तावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे स्थळ वरिष्ठांना अहवालाद्वारे कळविले आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
या वर्दळीच्या ठिकाणी लागतील कॅमेरे
अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार, तिकीट आरक्षण केंद्र, पादचारी पूल, प्लॅटफार्म, पार्सल कार्यालय, स्टेशन प्रबंधकांचे कार्यालय, कॅन्टीन, वाहक-चालकांचे विश्रामगृह परिसर, चालक लॉबी, वाहनतळ, रेल्वे पोलीस ठाणे, रेल्वे रूळ परिसर आदी वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.
वरिष्ठांच्या पत्रानुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावर एकूण ८० कॅमेºयांची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव पाठविला आहे.
- सी. एच. पटेल, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, बडनेरा