पोलीस भरतीवर सीसीटीव्ही कॅमेर्यांची करडी नजर
By admin | Published: June 5, 2014 11:42 PM2014-06-05T23:42:01+5:302014-06-05T23:42:01+5:30
पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस भरती प्रक्रियेला शुक्रवार (ता.६) पासून प्रारंभ होणार आहे. यासाठी शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात
अमरावती : पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस भरती प्रक्रियेला शुक्रवार (ता.६) पासून प्रारंभ होणार आहे. यासाठी शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहर व ग्रामीण पोलीस भरतीसाठी एकूण १६ हजार ६७२ उमेदवार रिंगणात उतरणार आहे. भरती प्रक्रियेदरम्यान कुठलाही घोळ होऊ नये यासाठी भरती घेण्यात येणार्या सर्व प्रांगणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. या कॅमेर्यांची भरती प्रक्रियेवर करडी नजर राहणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहर पोलीस आयुक्तालयासाठी घेण्यात येणार्या भरती प्रक्रियेत ९0 रिक्त पदांसाठी २ हजार १४0 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. यात ४00 महिला व १ हजार ७४0 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये २५0 रिक्त पदांसाठी १४ हजार ४३२ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये २ हजार ६0२ महिला व ११ हजार ८३0 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. भरती प्रक्रियेत ३0 टक्के महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. शहर पोलिसांसाठी घेण्यात येणारी भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय, विद्यापीठ व ग्रामीण पोलिसांसाठी घेण्यात येणारी भरती प्रक्रिया जोग स्टेडीअम व राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रांगणात होणार आहे. पोलीस मुख्यालय व जोग स्टेडीअमच्या प्रांगणात १00 मीटर दौड, गोळा फेक, पुल-अप, लाँग जम्प व राज्य राखीव पोलीस दल व विद्यापीठाच्या प्रांगणात ५ मीटर दौड घेण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेला पहाटे ५ वाजतापासून प्रारंभ होणार असून उमेदवारांनी दिलेल्या वेळेनुसार भरती प्रक्रियेला उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दररोज हजारो उमेदवारांची चाचणी
शहर व ग्रामीण पोलीस भरती प्रक्रीयेला शुक्रवारपासुन प्रारंभ होणार आहे. यासाठी शहर पोलीस भरतीसाठी दररोज ४00 व ग्रामीण पोलीस भरतीकरिता १ हजार उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात आले आहे. यामध्ये उमेदवारांच्या सत्य प्रती पाहून त्यांचे रजीस्ट्रेशन, छाती, उंची मोजण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण पोलीस भरती देणार्या पुरुष उमेदवारांची शाररीक चाचणी करण्यात घेण्यात येईल. ग्रामीणसाठी आलेल्या महिला उमेदवारांची शारीरिक चाचणी २0, २१ व २३ जून रोजी घेण्यात येईल. शहर पोलीस भरती देणार्या पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी १२ ते १५ जून व महिला उमेदवारांची शारीरिक चाचणी १६ जून रोजी घेण्यात येणार आहे.