मुख्य चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे बनले शोभेची वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:12 AM2021-04-17T04:12:07+5:302021-04-17T04:12:07+5:30
तळेगाव येथील प्रकार : स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष तळेगाव दशासर : गावात चौदाव्या वित्त आयोगांतर्गत लाखो रुपयांचा खर्च करून ...
तळेगाव येथील प्रकार : स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष
तळेगाव दशासर : गावात चौदाव्या वित्त आयोगांतर्गत लाखो रुपयांचा खर्च करून ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. कॅमेरे निकृष्ट दर्जाचे असल्याने ते आठ महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याचे चित्र आहे.
गावातील शिवाजी चौक, पोलीस स्टेशन चौक, जयस्तंभ चौक, मेडिकल चौक, मारवाडी पुरा अशा अत्यंत वर्दळीच्या मार्गावर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु, प्रशासकीय व्यवस्थेत या कॅमेऱ्यांचा पूर्णपणे बट्याबोळ झाला आहे. सध्या सण-उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंतीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आल्यास पोलीस यंत्रणेला हे कॅमेरे साहाय्य करू शकतात. मात्र, मुख्य रस्ता व मुख्य चौकातील एकूण १४ कॅमेरे बंद असून, ते केवळ शोभेच्या वस्तू बनले आहेत. गावाची सुरक्षाच ग्रामपंचायतीने वाऱ्यावर सोडल्याचे चित्र दिसत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी गावातील नागरिक व व्यावसायिक करीत आहेत.