सीसीटीव्ही कॅमेरातून आता शहरावर ‘नजर’
By admin | Published: January 20, 2015 10:33 PM2015-01-20T22:33:09+5:302015-01-20T22:33:09+5:30
सुरक्षिततेच्या दृष्टिने पालिका प्रशासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून शहरातील महत्वपूर्ण १८ चौकात शंभरावर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने ७५ लाखांच्या खर्चाचे
प्रशांत देसाई - भंडारा
सुरक्षिततेच्या दृष्टिने पालिका प्रशासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून शहरातील महत्वपूर्ण १८ चौकात शंभरावर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने ७५ लाखांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. येत्या काही दिवसातच शहरातील प्रत्येक चौकातून नागरिकांवर या कॅमेरातून करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
एखादी अनुचित घटना घडल्यास त्या घटनेचे धागेदोरे आणि जिवंत पुरावे गोळा करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज महत्वाचे ठरतात. मात्र, सव्वालाख लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाहीत. यामुळे शहरासोबतच नागरिकांच्यादृष्टिने हे धोकादायक होते. ही बाब घेरून नगरपालिका प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे. शहरातील अतिमहत्वाच्या चौकासोबतच अन्य चौकातही हे कॅमेरे पालिका प्रशासन कॅमेरा लावणार आहेत. यासाठी पालिकेने दोन महिन्यापूर्वी मंजूरी दिली असून त्यासाठी अंदाजपत्रक बनविण्यात आले आहे. शहरातील १८ चौकात शंभरावर कॅमेरे लावण्यात येणार आहे. यासाठी ७५ लाखांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. शहरातील मोठ्या चौकात लावण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरासाठी ४ लाख ८७ हजार तर लहान चौकासाठी ३ लाख ७३ हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. मोठ्या चौकात पाच ते सहा तर लहान चौकात चार ते पाच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. यासाठी बनविण्यात आलेले अंदाजपत्रक पालिका प्रशासनाने अंतिम मंजूरीसाठी नागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता (विद्युत) यांच्याकडे पाठविले आहे. मंजूरी मिळताच शहरात लागणाऱ्या कॅमेरासाठी ई-टेंडरीग होणार आहे.