सीसीटीव्हीने टिपले संचालकांना नाही दिसले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:54 AM2019-08-21T00:54:52+5:302019-08-21T00:56:02+5:30
स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये अडत्यांच्या मालामधून धान्यचोरीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. याबाबत बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी तक्रार देऊनही संबंधित चोर एका संचालकाच्या जवळचा असल्याने प्रकरण दडपण्याचा खटाटोप केला जात आहे.
सुमीत हरकुट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये अडत्यांच्या मालामधून धान्यचोरीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. याबाबत बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी तक्रार देऊनही संबंधित चोर एका संचालकाच्या जवळचा असल्याने प्रकरण दडपण्याचा खटाटोप केला जात आहे. सत्तेतील संचालक याबाबत बोलायला तयार नसले तरी विरोधकांच्या दबावापुढे झुकत याबाबत स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. धान्यचोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असताना त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई न करता ‘अळीमिळी गुपचिळी’चे धोरण स्वीकारल्याने समिती संचालकांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
तालुक्यातील शेतकरी मोठ्या विश्वासाने बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीस आणतो. मात्र, तो माल बाजार समितीत सुरक्षित नसेल, तर शेतकऱ्यांनी विश्वास कोणावर ठेवावा, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे. १२ आॅगस्ट रोजी बाजार समिती परिसरातून एका अडत्याच्या मालातून तुरीचे काही कट्टे चोरीस गेल्याची घटना घडली होती. याबाबत शेतकरी व संबंधित अडत्याने बाजार समिती प्रशासनाला लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार संचालकांनी १३ आॅगस्ट रोजी परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांच्या फुटेजची तपासणी केली. त्यात एका अडत्याच्या मालातून खराळा येथील दोन इसम तुरीचे कट्टे नेत असल्याचे आढळून आले. मात्र, ते चोर हे एका सत्तारूढ संचालकाच्या जवळचे असल्याने या प्रकरणावर काही संचालकांनी मिळून पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेल्यास आपणही आरोपींच्या पिंजºयात उभे होऊ, असे सांगत आढळलेल्या चोरांकडून चोरीस गेलेल्या मालाची किंमत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बाजार समितीत महिन्याभरात चोरी गेलेल्या मालाची पडताळणी करून नुकसान झालेल्या मालाची भरपाई रक्कम म्हणून ५० हजार रुपये घेण्यावर काही संचालकांचे एकमत झाले.
चोरांकडून ५० हजार रुपये घेण्याच्या निर्णयावर काही संचालक व अडत्यांनी नाराजी दर्शविली. यापूर्वीही अनेकदा बाजार समितीत चोरी झाली आहे. हे प्रकरण दडपल्यास चोरांचे फावेल अन् सीसीटीव्हीत पकडले गेल्यास पैसे देऊन सोडून देण्याचा नवीन प्रघात पडेल, असे मत काही संचालकांनी व्यक्त केले. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाचे प्रमुख म्हणून सचिव मनीष भारंबे यांनी मोघम तक्रार दाखल करण्याचा मध्यम मार्ग निवडला. १९ आॅगस्ट रोजी स्थानिक पोलिसांमध्ये लेखी तक्रार देण्यात आली. तरीही धान्य चोरणारे चोर अद्यापही मोकाटच आहेत. यापूर्वीही अनेकदा शेतकरी व अडत्यांचा माल चोरी गेला होता. मात्र, बाजार समितीमधील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, तर काही निकृष्ट दर्जाचे असल्याने चोरी गेलेल्या मालाचा सुगावा लागला नाही.
शेतकºयांच्या बाजार समितीतून तूर, हरभरा, सोयाबीन चोरी जाणे नित्याचे झाले आहे. शिरजगाव बंड येथील उपसरपंच किशोर खवले तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश वानखडे यांचे याच बाजार समितीतून धान्य चोरीस गेले होते. त्यावेळी या दोन्ही शेतकऱ्यांनी लेखी तक्रारी दिल्या. मात्र, बाजार समितीचे पदाधिकारी वा प्रशासनाकडून त्या तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आली. बाजार समितीच्या या कारभाराविरुद्ध शेतकरी वर्गात मोठी नाराजी व्यक्त होत आहे.
संचालकांच्या सूचनेवरुन १९ आॅगस्ट रोजी बाजार समिती यार्डातील धान्यचोरीबाबत लेखी तक्रार नोंदविली. समिती स्तरावरूनही चौकशी करण्यात येत आहे.
- मनीष भारंबे
सचिव, बाजार समिती, चांदूरबाजार