आयुक्तांच्या दालनातून सीसीटीव्ही फुटेज गहाळ ?
By Admin | Published: March 3, 2016 12:19 AM2016-03-03T00:19:21+5:302016-03-03T00:19:21+5:30
महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या दालनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज गहाळ केल्याची विश्वसनीय माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
अजब-गजब प्रकार : फेब्रुवारी महिन्याचे फुटेज गेलेत कुठे ?
अमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या दालनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज गहाळ केल्याची विश्वसनीय माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. महिनाभराचे फुटेज अचानक गेले कुठे? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या आमसभेत आयुक्त गुडेवार यांच्यावर सत्तापक्ष आणि विरोधकांनी आरोपांचे रान उठविले आहे. अशातच मागील आठवड्यात सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेच्या प्रकल्प अधिकारी वंदना गुल्हाने यांनी सिटी कोतवाली पोलिसात तक्रार नोंदवून आयुक्तांना लक्ष्य केले आहे. आयुक्त गुडेवार यांची चहुबाजुने नाकाबंदी केली जात असताना त्यांच्या दालनातील अतिविशेष कक्षात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज गहाळ झाल्याने अनेक चर्चांना उत आला आहे. हे फुटेज कोणी, कशासाठी गहाळ केले? याबाबत तर्क लढविले जात असून यामागे बरेच राजकारण दडल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी आयुक्त चंद्रकांत गुडेवार, उपायुक्त चंदन पाटील, विनायक औगड यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. भेटीगाठी, अभ्यागतांसोबत होणारा संवाद, मोर्चे, आंदोलकांच्या हालचाली टिपण्यासाठी ही व्यवस्था आहे. या सीसीटीव्हीचे कंट्रोल रुम आयुक्तांच्या ‘एन्टी’ कक्षात आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यात आयुक्त, उपायुक्तांच्या दालनातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला संवाद, चित्रिकरण गहाळ झाल्याची माहिती आहे. फुटेज गहाळ होण्यामागे दडलेले नेमके कारण शोधून काढण्याचे मोठे आव्हान आता आयुक्तांना पेलावे लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यातील सीसीटीव्हीचे फुटेज उपलब्ध नसल्याने हा प्रकार आयुक्तांच्या दालनातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. आयुक्त, उपायुक्तांच्या दालनात फेब्रुवारी महिन्यात असे काय घडले की ज्यामुळे फुटेज गहाळ करण्यात आले?, हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. गुडेवार हे ‘डेअर डॅशींग’ अधिकारी म्हणून प्रसिध्द आहेत. असे असताना त्यांच्या दालनातून सीसीटीव्हीचे फुटेज गहाळ होणे, ही बाब महापालिका प्रशासनासाठी धक्कादायक मानली जात आहे. (प्रतिनिधी)