परीक्षा केंद्रावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 06:24 PM2020-02-03T18:24:45+5:302020-02-03T18:25:13+5:30
पाच जिल्ह्यांत अंमलबजावणी; १७२ परीक्षा केंद्रे निश्चित
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या उन्हाळी २०२० परीक्षांना १५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. त्याकरिता पाचही जिल्ह्यांत सुमारे १७२ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य असणार आहे. त्यानुसार परीक्षा विभागाने प्राचार्यांना पत्र पाठविले आहे.
विद्यापीठ अंतर्गत ३९४ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा परीक्षांचे नियोजन चांगल्या पद्धतीने करण्यासाठी विद्यापीठाने तयारी चालविली आहे. परीक्षा शांततेत आणि कॉपीमुक्त होण्यासाठी केंद्राधिकारी, सहकेंद्राधिकारी नियुक्त करण्यात येतात. मात्र, काही महाविद्यालयांत परीक्षेदरम्यान चिरीमिरीचे प्रकार घडतात. एवढेच नव्हे तर परीक्षांवर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ अशा पाचही जिल्ह्यांमध्ये फिरते पथकाचे गठनसुद्धा करण्यात येते. मात्र, असे असले तरी काही महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपी चालत असल्याचे प्रकारही यापूर्वी निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे आत आणि बाहेरील बाजूस दर्शनी भागात बसविण्याचे निर्देश दिले आहे. गतवर्षीपासून परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंदर्भात आदेश बजावण्यात आले होते. मात्र, काही परीक्षा केंद्रावर प्राचार्यांना अंमलबजावणी केली. तथापि, काही परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयात अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाही. त्यामुळे यंदा उन्हाळी परीक्षेदरम्यान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून तसा अहवाल पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासंदर्भात प्राचार्य, संस्थाध्यक्षांना पत्र पाठविले आहे.
गैरप्रकाराला बसणार आळा
परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर गैरप्रकाराला आळा बसेल, असा दावा परीक्षा विभागाने केला आहे. परीक्षेच्या तीन तासात नेमके काय झाले? याची तपासणी करावयाची असल्यास सीसीटीव्ही फुटेज तपासता येणार आहे. सीसीटीव्ही लागणार असल्यामुळे विद्यार्थीसुद्धा गैरप्रकाराचा मार्ग स्वीकारणार नाही, असा विश्वास विद्यापीठाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि शैक्षणिक बाबी दृढ व्हाव्यात, यासाठी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षा केंद्रावर गैरप्रकाराला आळा बसविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येतात. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यात भर पडणार आहे. ही बाब विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हिताची आहे. केंद्रावरील गैरप्रकाराला आळा बसण्यास मदत होईल.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ