काळजी घेत साजरे करा सण, उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:11 AM2021-04-14T04:11:57+5:302021-04-14T04:11:57+5:30
धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समोर येणारे सर्व सण, उत्सव घरात राहूनच साजरे करा. त्यासाठी कुठलीही गर्दी होणार नाही ...
धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समोर येणारे सर्व सण, उत्सव घरात राहूनच साजरे करा. त्यासाठी कुठलीही गर्दी होणार नाही किंवा शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याची काळजी प्रत्येक नागरिकाने घ्यावी. कोरोनाकाळात आपले कुटुंब अडचणीत येणार नाही, याचीही काळजी घेण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांनी केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, शहरांसह ग्रामीण परिसरातही तो झपाट्याने पसरत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. रात्री संचारबंदी आहे. गुढी पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती असे अनेक सण-उत्सव आहेत. हे सण इतर वेळी आपण मोठ्या धूमधडाक्यात साजरे करीत असतो. परंतु, गतवर्षीप्रमाणे याही वर्षी कोरोनाने आपला पिच्छा सोडला नाही. त्यामुळे याही वर्षीही आपल्याला कर्तव्याची जाणीव ठेवत सण उत्सव घरगुती वातावरणात साजरे करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांनी केले आहे. लॉकडाऊन असताना तसेच कोरोनासंबंधी शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी करावे. पोलिसांना नियम व शिस्त पाळण्यास सहकार्य करावे, असे आवाहनदेखील यावेळी जाधव यांनी केले आहे.