मेजर ध्यानचंद यांची जयंती क्रीडा उपक्रमाने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:18 AM2017-08-30T00:18:23+5:302017-08-30T00:18:47+5:30
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व शारीरिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व शारीरिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिक ज्ञानमाता हायस्कूल ते पंचवटी चौक दरम्यान रॅली काढून विद्यार्थ्यांनी क्रीडा जनजागृती केली.
मेजर ध्यानचंद यांचे हॉकी खेळाबाबतचे योगदान हे सर्वदूर प्रसिद्ध आहे. केंद्र सरकारने मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस २९ आॅगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. क्रीडा खेळांबाबत प्रचार व प्रसार करणे हा हेतू सुद्धा शासनाचा आहे. त्याअनुषंगाने मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शहरातील सुमारे १० शाळांच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा जनजागृती रॅलीत सहभाग घेतला. रॅलीत ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होते. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘खेलोंगे तो जियोगें’, निरोगी आरोग्यासाठी मैदानी खेळ आवश्यक’ असे गगनभेदी नारे देऊन क्रीडा जनजागृती केली. श्री. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रागंणात पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमात शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नितीन चवाळ, शिवदत्ता ढवळे, संदेश गिरी, मेंहदी अली, प्राचार्य रवींद्र कडू, जिल्हाक्रीडाधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते.
शिवटेकडीवर हव्याप्र मंडळाच्या खेळाडूंनी चित्तथरारक क्रीडा प्रात्यक्षिक सादर केली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, माधुरी चेंडके, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, नगरसेवक दिनेश बूब, उपायुक्त नरेंद्र वानखडे, प्रमोद येवतीकर, प्राचार्य देवनाथ, जयंत इंगोले, विजय दलाल गोविंद कासट, केनीडी सिंग, दिनानाथ नवाथे आदी उपस्थित हाते.
कारागृहात मल्लखांब, योग प्रात्यक्षिक
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात मेजर ध्यानचंद यांची जयंती क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या खेळाडुंनी मल्लखांब, योग व कुस्ती या क्रीडा प्रकारावर आधारित नेत्रदीपक प्रात्यक्षिक सादर करून बंदीजणांना खेळाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, अशोक जाधव, गोविंद कासट, मधुकर बुरनासे, प्राचार्य देवनाथ, रावलाणी आदी उपस्थित होते.