बेरोजगार दिन साजरा करत युवक काँग्रेसने केला मोदींचा निषेध
By उज्वल भालेकर | Published: September 17, 2023 05:26 PM2023-09-17T17:26:41+5:302023-09-17T17:27:08+5:30
पंचवटी चौकात तळले पकोडे, कामगार उपायुक्त कार्यालयाबाहेर कापला केक
अमरावती : प्रधानमंत्री नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वात नऊ वर्षांपासून भाजप केंद्रामध्ये सत्तेत आहे. या नऊ वर्षांमध्ये देशातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. युवकांना रोजगाराचे खोटे आश्वासन देत मोदी यांनी फसवणूक केली. त्यामुळे रविवारी नरेंद्र मोदींचा वाढदिवस युवक काँग्रेसने राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला. यावेळी शहरातील पंचवटी चौकामध्ये पकोडे तळून तसेच कामगार उपायुक्त कार्यालयाबाहेर बेरोजगार मजकूर असलेला केक कापत युवक काँग्रेसने मोदींचा निषेध नोंदविला.
केंद्रामध्ये २०१४ मध्ये भाजप सत्तेमध्ये आल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोठी यांनी दरवर्षी दीड कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु देशातील सुशिक्षित युवकांना रोजगार त मिळालाच नाही, परंतु मागील ४५ वर्षातील बेरोजगारीचा उच्चांक मात्र मोदीजींच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर वाढला. एकीकडे देशात युवकांच्या हाताला काम नाही आणि दुसरीकडे जातीयद्वेष पसरवून युवकांना भडकविण्याचे काम मोदी सरकार करत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. वाढत्या बेरोजगारीला केंद्राची चुकीची आर्थिक धोरणे कारणीभूत आहे. त्यामुळे युवकांची स्वप्नं धुळीस मिळवून त्यांचे भविष्य अंधकारमय केल्याचे आरोप करत युवक काँग्रेसने मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी मोंदीजींच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करत भाजप व केंद्र सरकारच निषेध केला.