उत्सव रुक्माई पालखीचा अमरावतीत दमदार स्वागत : यशोमती ठाकूर मित्र परिवाराचे आयोजन
By admin | Published: June 2, 2017 12:07 AM2017-06-02T00:07:50+5:302017-06-02T00:07:50+5:30
विदर्भाची पंढरी असलेल्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील देवी रुक्मणीच्या पालखीचे गुरूवारी सायंकाळी येथील बियाणी चौकात जंगी स्वागत करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भाची पंढरी असलेल्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील देवी रुक्मणीच्या पालखीचे गुरूवारी सायंकाळी येथील बियाणी चौकात जंगी स्वागत करण्यात आले. शासकीय महापूजेचा मान लाभलेल्या या सोहळयाचे आयोजन आ. यशोमती ठाकूर मित्र मंडळाने केले होते.
राज्यातील पहिली व ४२३ वर्षांची परंपरा लाभलेल्या व पंढरपूर येथे देवी रूक्मिणीच्या माहेरची म्हणून विशेष मान लाभलेल्या या पालखीचे श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून २९ मे रोजी पंढरपूर येथील आषाढी सोहळ्याकरिता प्रस्थान झाले. १ जून रोजी येथील बियाणी चौकात या पायदळ दिंडी सोहळयाचे आगमन होताच आतषबाजी, टाळमृदंगाचा निनाद व पुंडलिक वरदे, हरी विठ्ठलाच्या जयघोषात जंगी स्वागत करण्यात आले. याठिकाणी महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे, विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, आ. यशोमती ठाकूर, माजी आमदार भैयासाहेब ठाकूर आदींनी पालखीची शासकीय महापूजा केली.
स्वागताला सर्वपक्षीयांचा सहभाग
अमरावती : या पालखीच्या स्वागतासाठी शहरातील बियाणी चौकात षटकोणी आकाराचे रिंगण करण्यात आले होते. याठिकाणी विठ्ठल रूक्मिणीची सुबक मूर्ती ठेवण्यात आली होती. याच ठिकाणी पालखी ठेवण्यात आली. पालखीच्या स्वागतासाठी चौकासह मार्गावर भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या.महापौर,उपमहापौर,आ. यशोमती ठाकूर आदींनी पालखी खांद्यावर घेऊन चौकात आणली यावेळी विठ्ठल रूक्मिणीचा जयघोष करण्यात आला.
पालखीचे विधीवत पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानच्यावतीने विश्वस्त अतुल ठाकरे, सदानंद साधू व नामदेवराव अमाळकर आदींनी साडी- चोळीचा अहेर करून आ. यशोमती ठाकूर यांचा सत्कार केला. सोहळ्याला निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, तहसीलदार राम लंके, वैशाली पाथरे, गजेंद्र मालठाणे, अजित येळे आदींसह आ. यशोमती ठाकूर यांच्या मातोश्री पुष्पलता ठाकूर, विलास इंगोले, प्रकाश साबळे, दिनेश बुब, किशोर चांगोले, विलास मराठे, हरिभाऊ मोहोड, दिलीप काळबांडे, पूजा आमले, प्रकाश माहोरे, बबलू शेखावत, प्रणय कुलकर्णी, प्रदीप कोल्हे, अनंत मस्करे, बाळासाहेब देशमुख, प्रदीप हिवसे, बाळासाहेब आंबटकर, सुरेखा लुंगारे, बाळासाहेब भुयार, अभिजित बोके, जयंत देशमुख, सिध्दार्थ वानखडे आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात पालखीचा दोन दिवस मुक्काम
देवी रूक्मिणीच्या पालखीचा अंबानगरीत दोन दिवस मुक्काम राहणार आहे. गुरूवारी बियाणी चौकात स्वागत सोहळा पार पडल्यानंतर पालखी एकविरा देवी मंदिरात मुक्कामासाठी रवाना झाली. शुक्रवारी रवीनगर,छांगाणी नगर,गणेश विहार आदी ठिकाणी स्वागत होऊन पातशे महाराज यांच्या भामटी मठात मुक्काम करणार आहे.व रविवारी बडनेरा येथे पोहचून अकोला मार्गे पंढरपूर कडे रवाना होणार आहे.
शिस्तबद्ध सोहळा, कडक बंदोबस्त
देवी रूक्मिणीचा पायदळ पालखीचे बियाणी चौकात जंगी स्वागत करण्यात आले. बायपास मार्गावरील चौकात अत्यंत शिस्तबद्धपणे हा सोहळा पार पडला. खुद्द पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक पालखीचे पूजेला उपस्थित होते. या चौफुलीवरील सर्व मार्गाची वाहतूक दीड तासेपावेतो बंद ठेवण्यात आली. कडक बंदोबस्तात हा सोहळा पार पडला. हा सोहळ्याला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.