सिमेंट पोल अंगावर पडला, तरुण जागीच ठार; नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील घटना
By प्रदीप भाकरे | Published: March 21, 2023 01:07 PM2023-03-21T13:07:45+5:302023-03-21T13:07:59+5:30
कंत्राटदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
अमरावती : शेतशिवारातील जुना तिरपा सिमेंट पोल सरळ करत असताना तो तुटून झालेल्या अपघातात १९ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला, २० मार्च रोजी दुपारी ३.३० पुर्वी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा फसी ते जयसिंगा रोडवरील वासुदेव सैरिसे यांच्या शेतात ही घटना घडली. संकेत उर्फ दीप राधेश्याम गाठे (१९, रा. ढवलसरी) असे मृताचे नाव आहे.
याप्रकरणी गौरव गाठे याच्या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी २० मार्च रोजी रात्री महावितरणचा कंत्राटदार दिनेश मनोहर वसंतकार (रा. अकोला) याच्याविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. संकेत हा महावितरणची टेंडरधारक असलेल्या लक्ष्मी एंटरप्रायजेस, अकोला या कंपनीसाठी मजुरीचे काम करीत होता. २० मार्च रोजी दुपारी तो महावितरणच्या बडनेरा उपविभागातील जयसिंगा शिवारात काम करत होता. तेथील जुना तिरपा झालेला इलेक्ट्रिकचा सिमेंट पोल दोरीने बांधून सरळ करण्याकरीता ओढत होता. अचानक तो पोल खालच्या बाजुने तुटून संकेतच्या तोंडावर पडला, त्यामुळे तो रक्तबंबाळ होऊन घटनास्थळीच ठार झाला. आरोपी कंत्राटदाराच्या हयगयीमुळे आपल्या भावाला प्राण गमवावे लागले, अशी तक्रार मृत संकेतचा भाऊ गौरव (२१, रा. ढवलसरी) याने लोणी पोलिसांत नोंदविली.